Tuesday, November 19, 2024

आश्वासक चेहरा : ॲड. नरेंद्र सावईकर

ॲड. नरेंद्र सावईकर हे भाजपचा सध्याच्या घडीला आश्वासक असा चेहरा आहे. त्यांनी पक्षाचे काम करता करता स्वतःसाठी विधानसभा मतदारसंघाची बांधणी केली नाही. अन्यथा सावईकर हे निर्विवादपणे भाजपला पुढे नेणारे नेते अशी त्यांची असलेली ओळख आणखीन दृढ झाली असती. सावईकर यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी असा आहे. विचारांचा पाईक कसा असावा, हे जाणण्यासाठी आणि शिकण्यासाठी कोणीही सावईकर यांच्याकडे पाहावे.

आजही पक्षाची बाजू मांडण्यासाठी अवघड असा विषय असेल तर भाजपला चटकन सावईकर यांचेच नाव आठवते. परवाही नोकऱ्यांच्या चोरबाजारावरून भाजपला घेरण्याचे प्रयत्न झाले तेव्हा पक्षाची बाजू ठामपणे मांडण्यासाठी सावईकरच ठामपणे पुढे आले. प्रश्न कोणताही असो आपल्याला हव्या त्याच मुद्यांच्या आधारे उत्तरे देण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. मुळात वकील असल्याने त्यांचा युक्तिवाद हा बिनतोड असतो. विचारांचे पक्के असल्याने समोरच्या व्यक्तीने कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी सावईकर तसूभरही हलत नाहीत.
सावईकर यांचे वडील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी. त्यामुळे त्यांचे बालपण तसे दयानंदनगर-धारबांदोडा येथे गेले. तेथे होणारी ऊसाची लागवड त्यांनी लहानपणी अनुभवलेली. त्यात त्यांचे कुटंब सधन बागायतदार. त्या नात्याने त्यांना वृक्षवल्ली सोयरी केव्हाच झाली होती. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू विचारांना मिळाल्याने त्यांची पुढील वाटचाल ठरून गेलेली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी सुरू केले. त्यानिमित्ताने होणारा प्रवास आला. पणजीतील कार्यालयात पथारी टाकणे ओघाने आलेच.
वकील म्हणून कारकीर्द सुरू केली तरी विचारांची नाळ काही तुटली नाही. पुढे भाजपचे काम हाती घेतले. उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे तयार कर, इथपासून पक्षाची प्रशासकीय कागदपत्रे सरकारी यंत्रणांना सादर कर. यासाठी भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वाला सावईकर यांच्यारूपी हुकमी एक्का सापडला होता. सावईकर यांचे कार्यक्षेत्र विस्तारत होते. याचदरम्यान त्यांनी ‘गोवा बागायतदार’ या सहकारी संस्थेचे सुकाणू हाती घेतले आणि त्या संस्थेचा राज्यभर विस्तार केला. शेतकरी, बागायतदारांच्या शेतमालाची खात्रीशीर आणि योग्य दरात खरेदी करणारी संस्था आणि ग्राहकांना वाजवी दरात किराणा माल व ग्राहकोपयोगी वस्तू उपलब्ध करणारी संस्था, असे विश्वासार्ह स्थान त्यांनी या संस्थेला प्राप्त करून दिले आहे.
हे सारे करत असताना संघाच्या विचारांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सावईकर यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिलेले आहेत. मध्यंतरी पाच वर्षे ते खासदार होते. पुढे भाजपने उमेदवारी नाकारली तरी ते विचलित झाले नाहीत. त्यांनी जणू काही झालेच नाही, आपण विचारांचे काम म्हणून भाजपचे काम पुढे नेत राहणार, असे ठरवून ते कार्यरत राहिले. विचाराने चालणारा नेता कसा असावा याचे आदर्श असे उदाहरण त्यांनी यानिमित्ताने सर्वांसमोर ठेवले आहे. डोके शांत ठेवत पक्षाचा विचार सातत्याने मांडत राहणे तसे शक्य नसते. भाजपही आता बदलला आहे, राजकारणातील अपरिहार्यता भाजपने स्वीकारली आहे. बाहेरील नेते, कार्यकर्त्यांची आयात होत गेली आहे. यातून भाजपचा मूळ चेहरा हरवेल की काय, अशी भीती डोकावू लागली तरी सावईकर यांच्यासारख्या पक्षासाठी निरंजनासारख्या तेवत राहणाऱ्या नेत्याकडे पाहिले की भाजपचा मूळ गाभा कुठेच डळमळीत होणार नाही याची खात्री पटते.
गोवा सरकारने अनिवासी गोमंतकीयांसाठीचे आयुक्त म्हणून सावईकर यांची नियुक्ती केली. त्या पदाला मंत्रिपदाचा दर्जा आहे. तरीही सावईकर बदललेले नाहीत. संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षपद सरकारने त्यांच्याकडे सोपवले. त्यांनी इथेनॉल निर्मितीचा प्रस्ताव अन्य एका समितीकडून अभ्यास करवून घेऊन सरकारला सादर केला. या प्रकरणाला सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही तरी ते नाउमेद झालेले नाहीत. आपले काम पुढे नेत पुढे जात राहायचे हा त्यांचा शिरस्ता. ३० वर्षांपूर्वी ज्या तडफेने ते विचारांचे पाईक होते तीच तडफ आजही त्यांच्यात कायम आहे. अनेक जणांनी त्‍यांची साथ सोडली, अनेकजण त्यांच्या नव्याने साथीला आले तरी खांद्यावर दिलेली धुरा पुढे नेत ते चालत राहिले आहेत.
ते एवढ्यात थकणाऱ्यांपैकी नाहीत. विचारांशी गद्दारी तर ते कधीही करणार नाहीत. पक्की वैचारिक बैठक, रक्तात प्रामाणिकपणा, भाषांवर प्रभुत्व, कडक वक्तृत्व, हजरजबाबीपणा आणि स्वभावात मिश्कीलपणा असणारे सावईकर एकमेवाद्वितीय असेच आहेत. आज समाजकारण आणि राजकारण गढूळ होत असताना त्यांचा आश्वासक चेहरा त्याचमुळे उजळून निघणारा असा आहे.