गोव्याची ओळख केवळ चर्च, वास्तू आणि वसाहतकालीन इतिहासापुरती मर्यादित नाही. या भूमीने भारताच्या आणि आशियाच्या मुद्रण इतिहासाला एक निर्णायक वळण दिले आहे. १५५६ मध्ये जुने गोवे येथील सेंट पॉल महाविद्यालयात सुरू झालेला छापखाना हा भारतातीलच नव्हे, तर आशियातील पहिल्या युरोपीय धाटणीच्या मुद्रणयंत्राचा प्रारंभ मानला जातो. आज या घटनेला सुमारे ४७० वर्षे झाली आहेत.
विशेष म्हणजे, हा छापखाना मुळात गोव्यासाठी निघालाच नव्हता. पोर्तुगालहून अबिसिनिया म्हणजे आजच्या इथिओपियाला पाठविण्यात आलेले मुद्रणयंत्र गोव्यात थांबले. तेथील परिस्थिती बदलल्यामुळे ते पुढे न जाता गोव्यातच राहिले आणि सेंट पॉल महाविद्यालयात त्याची उभारणी झाली. इतिहासात योगायोग म्हणून नोंदलेली ही घटना पुढे ज्ञानप्रसाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली.
या छापखान्यातून सुरुवातीला धार्मिक साहित्य प्रकाशित झाले. १५५६ मध्ये Conclusiones Philosophicas हे प्रकाशन झाले, तर त्यानंतर सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या Catecismo da Doutrina Christaचे मुद्रण झाले. पुढे गोव्यातून विविध भाषांतील ग्रंथनिर्मितीला चालना मिळाली. गोव्याच्या मुद्रण इतिहासात धर्मप्रसाराचा हेतू महत्त्वाचा असला, तरी त्याच प्रक्रियेत भारतीय भाषांमध्ये मुद्रित साहित्य निर्माण होण्याचा मार्ग खुला झाला, हे दुर्लक्षित करता येणार नाही.
म्हणूनच जुने गोवे हे केवळ धार्मिक पर्यटनाचे ठिकाण म्हणून पाहणे म्हणजे त्याच्या इतिहासाचा एक मोठा भाग दुर्लक्षित करणे होय. येथे भारतातील मुद्रण संस्कृतीच्या एका महत्त्वपूर्ण पर्वाचा जन्म झाला. आज सेंट पॉल महाविद्यालयाचे प्रवेशद्वार हा त्या इतिहासाचा एक उरलेला भौतिक दुवा आहे.
मात्र, प्रश्न असा आहे की ४७० वर्षांच्या या मुद्रण वारशाचे आपण काय केले? गोव्याच्या वारसा संवर्धनाच्या चर्चेत चर्च, मठ, राजवाडे आणि वास्तू यांना जेवढे स्थान मिळते, तेवढे मुद्रण, प्रकाशन आणि ज्ञाननिर्मितीच्या इतिहासाला मिळते का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
गोवा सरकारच्या मुद्रण व लेखनसामग्री विभागानेही १५५६ मध्ये गोव्यात छापखाना सुरू झाल्याचे अधिकृतपणे नमूद केले आहे. इतकेच नव्हे, तर अलीकडील वारसा धोरणात गोव्याच्या मुद्रण व प्रकाशन इतिहासाला गौरवशाली वारसा म्हणून मान्यता देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
यामुळे जुने गोवे येथे केवळ एक स्मृतिफलक उभारणे पुरेसे ठरणार नाही. ‘गोवा आणि मुद्रण’ या विषयावर कायमस्वरूपी संग्रहालय, डिजिटल संग्रह, जुन्या ग्रंथांच्या प्रती, मुद्रण तंत्राचे प्रात्यक्षिक आणि संशोधकांसाठी अभ्यासकेंद्र उभारता येईल. जगभरातून जुने गोवे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ‘पहिला छापखाना’ हा अनुभव इतिहासाच्या जिवंत दालनातून देता येईल.
आज डिजिटल माध्यमांच्या युगात कागदावरील अक्षराचे महत्त्व कमी झाले असे वाटत असले, तरी माहितीच्या इतिहासात छापखान्याने घडवलेली क्रांती विसरता येणार नाही. आज आपण मोबाईलच्या पडद्यावर क्षणार्धात जगभरातील माहिती वाचतो; पण त्या ज्ञानप्रवासातील एक महत्त्वाचा प्रारंभबिंदू जुन्या गोव्याच्या मातीत १५५६ मध्ये उमटला होता.
म्हणूनच जुने गोवे हे केवळ श्रद्धेचे तीर्थक्षेत्र नव्हे; ते भारताच्या मुद्रण आणि ज्ञानप्रसाराच्या इतिहासाचेही तीर्थक्षेत्र आहे. ४७० वर्षांनंतर या वारशाकडे नव्या नजरेने पाहण्याची आणि तो पुढच्या पिढीपर्यंत जपण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment