Wednesday, May 11, 2011

कोझिकोड, अल्वाये, कोची, कोवालम

कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील खुदाईवर लक्ष ठेवणाऱ्या कंपनीतील अभियंता अब्राहम वार्के याच्या लग्नाच्या निमित्ताने केरळमध्ये राहण्याचा व भटकण्याचा योग आला होता. खऱ्या अर्थाने कालीकतला भटकलो ते सॉटर डिसोझासह. जानेवारीत कन्याकुमारीला जाताना सॉटर माझ्यासोबत होता. वाटेत कालिकतला थांबावे असे ठरले. आम्हाला वास्को द गामाने पहिला पाय ठेवला ती जागा बघायची होती. शहरापासून पंचवीस किलोमीटरवरील त्या जागेकडे गेलो तर तेथे पुरुषभर उंचीचा एक स्तंभ दिसला. स्थानिकांनी सांगितले की पूर्वी स्तंभ असलेल्या जागेवर समुद्राने अतिक्रमण केल्याने आजवर तीनदा स्तंभाची उभारणी केल्याचे सांगितले.कालिकतला मिळणारे मासे व उकडा भात आणि जेवणानंतर चघळायला देण्यात येणारा काळा हलवा कधीच विसरला न जाणारा असा होता. पण भावली ती रेल्वे स्थानकावरील स्वच्छता. कट्टर कम्युनिस्ट असलेल्या प्रा. एन. शोबिंद्रन यांच्याशी म्हणूनच मी रेल्वेच्या प्रतीक्षालयात अनेक विषयांवर दोन तास वाद घालू शकलो. तेथे स्वच्छतेची वेळ झाली की स्वच्छतागृहे सर्वांसाठी बंद केली जातात. दर चार तासांनी तसे केले जाते. यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.वार्केचे घर कोट्टायमजवळ एका बेटावर आहे. तेथे जाण्यासाठी फेरीबोट पकडून ये असा त्याचा निरोप. मी गोव्यात जशी फेरीबोट असते तशा फेरीबोटीची प्रतीक्षा कुमन्नम येथे अर्धा दिवस केली. अखेरीस एकाला विचारले त्या वेळी ट्रॉलरवजा बोटीलाच फेरीबोट म्हणतात असा साक्षात्कार झाला. पुढे घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत काळ्या चहाने करतात हाही धक्का बसला. त्याच्या घराभोवती असलेल्या पाण्यातून एकमेकांकडे जाण्यासाठीही छोट्या होड्यांचा वापर कसा केला जातो इथपासून जीप आणण्यासाठी दोन होड्यांच्या मध्ये फळ्या रचून तराफा कसा केला जातो हेही पाहता आले.कोची येथे इंडियन एक्‍सप्रेसमधला माझा मित्र मनु पबी याच्यासह फोर्ट कोची भागात ताजे मासे पकडून ते लगेच तळून कसे दिले जातात याचे प्रात्यक्षिक अनुभवले. पुढे गोमन्तक टाइम्समधील ऍण्ड्य्रू परेरा याच्यासह भटकंती करताना अल्वाये येथे हाउसबोटीच्या व्यवसायाचे अंतरंगही न्याहाळता आले. तीन वर्षांच्या मुलांना नदीत पोहायला शिकविणारे धाडसी लोकही तेथेच पाहता आले. मोठ्या बोटीवरील खोल्या ते वातानुकूलित रेस्टॉरंट व खोल्या असा हाउस बोटीचा प्रवास झाला आहे.गेल्या दशकातील केरळ आणि आजचे केरळ यात बराच बदल झाला आहे. 1994 ते 98 पर्यंत गावागावात कौलारू घरे दिसत. क्वचित एखादा उघडाबंब माणूस फक्त लुंगीवर दिसे. आज लुंगी टिकून असली तरी घरे मात्र बदलू लागली आहे. कॉंक्रिटीकरणाचे वारे पोचले आहे. पूर्वी लुंगीवर कुठेही जाण्यास मुभा होती. ते प्रतिष्ठेचे लक्षणही मानले जात होते. पण गेल्यावर्षी युवा वर्गाने पॅन्टला आणि त्यातील फॅशनलाही पाठिंबा दिल्याचे दिसले. स्वस्तात काजूगर पुरविण्याची किमया केरळने साधली आहे, कष्टाळू अशा केरळी समाजाला त्याला बुद्धीची जोड देत राज्य विकासपथावर नेले आहे. साक्षरतेचे प्रमाण केरळमध्ये जास्त असले तरी स्थानिक मल्याळम वगळता इतर भाषा न येण्याने होणारे तोटे कुठल्या पारड्यात टाकले जाणार?कनार्टकाला लागून असलेल्या अझीमला येथे नौदलाची अकादमी उभी राहत आहे. वेरे बेती येथील नौदल अकादमी तेथे हलविली जाणार असे जाहीर झाल्याने तेथे भेट न देणे शक्‍यच नव्हते. अकादमी दोन डोंगराच्या मधल्या भागात विस्तारली आहे. या दोन डोंगरांचा उल्लेख वास्को द गामाच्या प्रवास वर्णनात आहे. संरक्षणदृष्ट्याही टेहळणीसाठी ती मोक्‍याची जागा असल्याने तेथे अकादमी होणे हा निव्वळ योगायोग नव्हे. सध्या संचलन मैदान, मुख्य प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले असून प्रशिक्षणार्थींच्या वसतीगृहाची इमारत उभी राहत आहे. केरळच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या तिरुअनंतपुरम येथे सुती टॉवेल फार स्वस्त मिळतात. त्याही पुढे असलेल्या कोवालमला तर जगात उपलब्ध असणारे सर्वकाही मिळते. फक्त तिथे सध्या कॉंक्रिटचे जंगल उभे राहिले आहे इतकेच.

Monday, May 2, 2011

गोपुरी आश्रम

1999 मध्ये कणकवलीत असताना एक दिवस अमरसिंह घोरपडे नावाचे माझे सहकारी मला वागदे या तीन किलोमीटरवरील गावी असलेला गोपुरी आश्रम दाखविण्यास घेऊन गेले. तेथे प्रा. राजेंद्र मुंबरकर या तिशीतील तरुणाचा परिचय झाला. मुंबरकर कणकवली महाविद्यालयात ग्रामीण विकास विषय शिकवतात. आता ते पीएचडी मिळवून प्रा. चे डॉ. मुंबरकरही झाले, तरी आमची मैत्री त्याच पातळीवर कायम आहे. मुंबरकर यांनी तेथील गोशाळा, शेती फिरून दाखविली. त्या वेळी या आश्रमाच्या व्यवस्थापनाचा ताबा एक दिवस माझ्याकडे येईल अशी पुसटशी कल्पना देखील माझ्या मनाला शिवली नाही. समाजवादी चळवळीशी असलेली जवळीक त्यासाठी उपयोगी ठरली. जयवंत मठकर, गणपत सावंत, रमाकांत आर्ते, गोविंदराव शिंदे दादा यांना मी कणकवलीत आल्याचे कळले. एकदा मठकरकाका आले नि माझ्या जानवलीतील खोलीतील सर्व साहित्य गोपुरीतील विश्रामगृहात हलविण्याचा जणू आदेशच दिला. त्यानंतर मला व्यवस्थापन समितीवर कायम निमंत्रित असे स्थान देण्यात आले. दैनंदिन व्यवस्थापनात माझा शब्द अखेरचा ठरू लागला. तेथे असताना संस्था फायद्यात आणण्याची किमया सर्वांच्या मदतीने साधली. नर्सरी सुरू केली. नर्सरी प्रशिक्षण वर्ग सुरू केला. खतविरहीत ताजी भाजी मोठ्या प्रमाणावर मिळण्यासाठी प्रयत्न केले. गणपत पाटील यांच्या मदतीने उसाची शेती केली. केळीच्या नव्या जातींची लागवड केली. जुनाट पंप बदलून नवा जादा अश्‍वशक्तीचा पंप बसविला. अप्पासाहेबांच्या या कार्याची साक्ष देत गोपुरी आश्रम आजही कणकवलीनजीक वागदे येथे कार्यरत आहे. कोकण गांधी म्हणून ओळखले जाणारे अप्पासाहेब 1922 मधील द्विपदवीधर. इंग्रजांच्या त्या आमदनीत त्यांना प्रशासनात उच्च अधिकाराची नोकरी करणे सहज शक्‍य होते; पण त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. 1930 ला महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला, तर अप्पासाहेबांनी सिंधुदुर्गातील शिरोडा येथे हा सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या चिरस्थायी विकासाचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पटवर्धन यांनी आपल्या मायभूूमीची वाट धरली. कणकवलीनजीक वागदे गावात त्यांचे सहकारी मित्र प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या सहकार्याने 18 एकर टाकावू जमिनीवर 5 मे 1948 रोजी गोपुरी आश्रम या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. केवळ संकल्पना न मांडता आपले विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. युरोपियन देशातील उच्च राहणीमान अप्पांनी अनुभवले होते. भारतीय लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे हे धोरण त्यांनी अवलंबिले. गोरगरीब लोकांना परवडतील, असे शौचालय बांधण्याचे प्रयोग त्यांनी केले. सोन खतापासून उत्तम खत निर्माण होते हेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी उभारलेली मॉडेल्स आजही गोपुरी येथे पाहायला मिळतात. गोबरगॅस आणि त्यावर जेवण शिजविण्याचा त्यांचा प्रयोग म्हणजे सुरवातीला आक्रीतच वाटले. उत्तम बायोगॅस निर्माण करता येऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी कणकवलीतील छात्रालय येथे "मैला गॅसप्लॅन्ट' उभारला. अप्पांनी ग्रामीण ऊर्जा व स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेक प्रयोग केले. धवल क्रांतीची कोकणात सुरवात व्हावी यासाठी संकरित गायी आणल्या. पुण्याहून चारा आणला. फलोत्पादन, शेतीचे नवे प्रयोग, पेरू, केळी, आंबा, यावर वेगवेगळे प्रयोग, मसाले पिकांची लागवड त्यांनी स्वतः केली व शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. आजही गोपुरीत अनेक प्रयोग सुरू आहेत. काजू सरबताचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. आजही कृषी सहली गोपुरीला आवर्जून भेट देतात. नंदकिशोर परब, सरिता धामापूरकर, जया सदडेकर, उमेश जाधव, प्रसाद आचरेकर यांनी गोपुरी आश्रमात नव्या कल्पना राबविण्यासाठी चांगले सहकार्य केले. त्या आश्रमात असताना कोकण दौऱ्यावर आलेले अण्णा हजारे माझ्या खोलीत एक दिवस मुक्कामाला राहिले ही आठवण मी हृदयात जपून ठेवली आहे.

Saturday, April 30, 2011

सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी

परमेश्‍वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी असा उल्लेख मला 1998 मध्ये ऐकता आला. 1998 मधील जुलैपासून सलग वर्षभर मी सावंतवाडीत होतो.तलावाच्या काठावर वसलेले हे शहर अलीकडच्या काळात उदयाला आले आहे. गाव मौजे चराठे या गावाची सावंतवाडी ही वाडी अशी माहिती मला सावंतवाडीतील दै. "कोकणसाद'चे संपादक गजानन नाईक यांच्याकडून मिळाली. आजही चराठेभोवती असलेला खंदक पाहता येतो. विजय देसाई यांच्यासोबत त्या खंदकाची पाहणी मी केली होती. तेव्हाही तो सुस्थितीत होता. सावंतवाडीत असताना श्रीराम वाचन मंदिरात जाऊन बसणे हा माझा नित्याचा उद्योग होता. 100 वर्षे होऊन गेलेले हे वाचनालय आजही सुस्थितीत आहे. आता तर नवी इमारत उभी राहिली आहे. ग्रंथपाल दीनानाथ नाईक यांचा हसरा चेहरा आजही नजरेसमोर आहे. या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयानंद मठकर हे नेहमी कुठली पुस्तके वाचनालयात हवीत याविषयीची माझी मते आवर्जून ऐकत. त्यामुळेच की काय अनेक विषयांवरील पुस्तकांचा मोठा संग्रह या वाचनालयात आहे. सावंतवाडीत असताना तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांच्याशी माझा विशेष स्नेह जुळला. विकासाच्या बाबतीत त्यांची मते ऐकून मला कधी कधी थक्क व्हावे असे वाटत असे. त्यांच्याच कारकिर्दीत तळ्याच्या बाजूला संगीताच्या तालावर नृत्य करणारा कारंजा, अद्ययावत उद्यान उभे राहिले. एवढेच कशाला रेस्टॉरंटही सुरू झाले. तळ्याच्या भोवती जॉगिंग करण्यासाठी पदपथ आकाराला आला. मोती तलावात झालेले शेवाळ खाण्यासाठी मासे आणून तलावात सोडण्याचा उपक्रम नगरपालिकेने राबविला होता. मे महिन्याच्या पूर्वी तलावातील पाणी आटू लागते त्याच दरम्यान ते मासे कुणी तरी खाण्यासाठी पळविण्याचा प्रकारही उघडकीस आला होता. अजीज शेख हे मुख्याधिकारी असताना अचानकपणे तळे आटविण्याच्या प्रकाराची मोठी चर्चाही आजही आठवते.सावंतवाडीच्या मोती तलाव ही पूर्वीच्या काळची सिंचन व्यवस्था होती. त्या संदर्भातील जुने कागदपत्र प्रा. जी. ए. बुवा यांच्याकडे मला पाहता आले. त्या काळी सावंतवाडीत पिण्याचे पाणी केसरी या गावातून आणण्यात येत होते. आजही ती व्यवस्था कायम असून गोविंद चित्रमंदिर येथे असलेला सार्वजनिक नळ हा केसरीच्या पाण्यावर चालतो. सावंतवाडीहून बेळगावकडे जाणारा मार्ग फुटतो त्या तिठ्याला गवळी तिठा असे नाव आहे. गेल्या दोन वर्षांत त्या भागात मोठ्या इमारती उभ्या राहून त्या भागाचा चेहरा-मोहराच बदलला आहे. पूर्वी सिनेमाघर होते त्या जागी आता मोठाले कॉम्प्लेक्‍स उभे राहिले आहे. पालिकेजवळ उघड्यावर चालणारा बाजार आता बंदिस्त इमारतीत हलविण्यात आला आहे. सावंतवाडीच्या बाजारातून वरच्या बाजारात जाताना वाटेत विठ्ठल मंदिर लागते. या मंदिरातून पूर्वी शहराच्या सर्व सीमा दृष्टीस पडत. आता इमारती उभ्या राहिल्याने ती मजा हरवली गेली आहे. या वरच्या बाजारातून खाली उतरताना चितार आळी लागते.सावंतवाडी हे शहर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे असा उल्लेख पाठ्यपुस्तकात होता. ही ओळख पटवून घेण्यासाठी चितार आळीशिवाय पर्याय नाही. तेथे अशी खेळणी मिळणारी ओळीने सात दुकाने आहेत.सावंतवाडीत असताना पत्रकार अरविंद शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. गेली 25 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या शिरसाट यांची स्मरणशक्‍ती दांडगी. सावंतवाडीविषयी सर्व संदर्भ त्यांना तोंडपाठ. एकदा मला त्यांनी हंसा वाडकर यांच्या सावंतवाडीत असलेल्या घराविषयी थोडीफार माहिती दिली होती. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे नंदू ऊर्फ नंदकिशोर पेडणेकर यांनीही सावंतवाडीत पूर्वीच्या काळी पथदीप कसे होते, सावंतवाडीत कर व्यवस्था, न्यायदान व्यवस्था कशी होती याची माहिती दिली. सालईवाड्यात शंभर वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचे दृश्‍य आजही डोळ्यासमोर येते.सावंतवाडीच्या राजघराण्यातील समाध्या माठेवाडा भागात आजही पाहायला मिळतात. राजेश नाईक त्या भागात राहतात. त्यांनी मला या माठ्यांविषयी माहिती दिली. सावंतवाडीत जाण्याचे प्रवेशद्वार म्हणजे गोलगावचा दरवाजा. आता ही वास्तू सुस्थितीत असली तरी 1998 मध्ये तिच्या दुरवस्थेबद्दल लिहिल्याबद्दल कोलगाव दरवाज्याचे मालक "सुकी' यांच्याकडून मला थोडे ऐकावे लागले होते.सावंतवाडीत आता शिल्पग्राम उभे राहत आहे. परवाच शिवप्रसाद देसाई यांच्याशी बोलताना ते लवकरच आकाराला येईल, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा सावंतवाडीत जाण्याची संधी मिळाली तर शिल्पग्राम पाहण्याचा मानस आहे.

Friday, April 22, 2011

पार्से गाव नव्हे, नररत्नांची खाण!

मुंबईचा भाऊंचा धक्का फार प्रसिद्ध आहे. साहित्यातही तो अजरामर झाला आहे. या धक्‍क्‍याचे नामकरण ज्यांच्या नावावरून झाले ते भाऊ पार्सेचे. पार्से गाव नव्हे, तर ही नररत्नांची खाणच आहे. देश पातळीवर गाजलेल्या अनेकजणांची जन्मभूमी. सध्या गोव्याच्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सव सुरू आहे.या मुक्तीसाठीच्या लढ्यातील पहिला उठाव याच पार्सेत झाला. त्यानिमित्ताने या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या.कोण कुठला ? तर तो पार्सेचा असे सांगितल्यावर गोवाभर नव्हे, तर कोकणातही आदराने पाहिले जाते. सेतू माधवराव पगडी पार्सेत आले, त्यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर झालेल्या प्रश्‍नोत्तराच्या वेळी गावाची महती अनेकांना कळली. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरवात पार्सेत झाली याचा उल्लेख होतो तेव्हा छाती अभिमानाने भरून येत नसेल असा पार्सेवासीय नाही. इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते, की हा केवळ गाव नव्हे तर अनेक नररत्नांची ही खाणच आहे आणि त्यातून यापुढेही इतिहास घडवणारी रत्ने जन्माला येतील असेच या गावचे वातावरण आहे.26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 19 डिसेंबरला श्री भगवती मंदिराजवळच्या स्मारकाला वंदन केले जाते. त्यावेळी भाषणे होतात. त्यात गावाविषयी फारसे अभावानेच बोलले जाते. नव्या पिढीला या गावाचा वारसा सांगण्याची गरज आज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे. क्रांतिकारकांचा गाव ही ओळख अनेक प्रश्‍नांवर गावाने घेतलेल्या प्रखर भूमिकेमुळे आजही गोव्याला आहे. सध्या नागरी विभागात समावेश झाल्याने दूरध्वनीचे मासिक भाडे वाढले आहे, त्याविरुद्ध पार्सेवासीय एकवटले आहेत.निसगार्ने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या गावातील संपदाही गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक जपली आहे. चारशे वर्षांपूर्वी येथील लोक लढवय्ये होते अशी नोंद इतिहासात आढळते. गावात ताणतणाव असले, तरी जत्रा, गणेश चतुर्थी, दसरा सणांच्यावेळी एकत्र येण्याची परंपरा आजही कायम आहे. जत्रेला गावी न येणारा इथला रहिवासी विरळच. गावाला संगीताचीही मोठी परंपरा आहे. महिलांना आज आरक्षण देण्याची मागणी वाढत चालली आहे. आज कोणालाही खरे न वाटो परंतु 1917 मध्ये बाळा पार्सेकर यांनी स्त्री नाटक मंडळ सुरू केले होते. त्यात नाटकातील सर्व भूमिका महिलाच करायच्या. गोवा, उत्तर कर्नाटक, कोकण ते पार मुंबईपर्यंत या मंडळाने नाट्यप्रयोग सादर केले आहेत. आजही हौशी रंगभूमीवर शिमग्याच्यावेळी रंगमंचावर जाण्यास अनेकजण उत्सुक असतात.पार्से युवक संघाने रंगभूमीवर आणलेली नाटके नाट्यप्रेमी विसरूच शकणार नाहीत. गोव्याचे महाराष्ट्रात आणि दिल्लीत प्रतिनिधित्व करण्याचा मान या संघाने अनेकदा पटकावला आहे. या संघाच्या "अशी पाखरे येती'च्या आठवणी आजही सांगितल्या जातात. अशा अनेक गोष्टी या गावाबद्दल सांगता येतील. पार्सेत चार मार्गे येता येते. शिवोली चोपडे पुलाकडून आगरवाडामार्गे, केरी हरमलहून कोरगावमार्गे, कोलवाळ धारगळहून तुयेमार्गे किंवा सरळ पेडण्यातून किंवा मोरजीहून. पार्से म्हटल,े की स्व. गोविंद मंगेश लाड (अर्थशास्त्र तज्ज्ञ व संपादक), स्व. डॉ. भाऊ दाजी लाड (डॉक्‍टर, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक), स्व. परशुरामबुवा पार्सेकर (गायक), स्व. दामू अण्णा पार्सेकर (तबला वादक), स्व. भालचंद्र पार्सेकर (तबला वादक), स्व. यशवंत बुगडे (स्वातंत्र्यसैनिक), स्व. श्रीधर पार्सेकर (व्हायोलिन वादक) यांची नावे आठवतात. त्यांच्यानंतरच्या पिढ्याही कर्तबगार निघाल्या. शिक्षण संचालक अशोक देसाई, औद्योगिक विकास महामंडळाचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक गोपाळ देसाई, लेखिका सुमेधा कामत देसाई, तियात्रीस मार्सेलीनो दी बेतीम, मुंबईच्या बेस्टचे माजी अध्यक्ष रामानंद लाड, मराठी नाट्यसृष्टीतील भालचंद्र कळंगुटकर, सुरेंद्र देसाई (वकील), अमोल म्हालदार (शल्यविशारद), अरुणा प्रभू (डॉक्‍टर), देवेंद्र आरोलकर (मेकॅनिकल इंजिनिअर), सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक केशव आत्माराम प्रभू, बाळकृष्ण कानोळकर (प्राध्यापक), हनुमंत गवंडी (वकील), दशरथ पेटकर (वकील) यांचीही नावे सहजपणे आठवतात.

कुडाळची घोडेबाव आणि बरेच काही

1998-99 मध्ये सावंतवाडीला असताना मी तेर्सेबांबर्डे येथे राहत होतो. तेथून कुडाळ सहा किलोमीटरवर. कुडाळला पत्रकार अर्जुन राणे यांनी सांगेपर्यंत कुडाळ म्हणजे काय ते मला कळले नव्हते. कुडाळचा पट राणे, देवेंद्र वालावलकर, नरेंद्र खोबरेकर, रवी गावडे यांनी उलगडून दाखविला.अकराव्या शतकापर्यंत कुडाळ प्रांताच्या राजधानीचे हे ठिकाण होते. सध्या येथे असलेली न्यायालयाची इमारत म्हणजे भुईकोट किल्ला होय. शिवाजी महाराजांनी बांधलेली ऐतिहासिक घोडबाव विहीर शहरात बसस्थानकासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर आहे. तेथेही मी अनेकदा राहिलो. तेथे आबा शिरसाट यांच्याशीही अनेकदा माझी कुडाळ व अनेक विषयांवर अनेकदा चर्चा होत असे.कुडाळपासून 20 कि.मी. अंतरावर नारूर गाव आहे. तेथून रांगणागडावर जाण्यासाठी दीड ते दोन तास पायी जावे लागते. तेथेही जाण्यासाठी पाय दुखेपर्यंत (आठवडाभरपर्यंत) मी चाललो. वाडोस, पांग्रड या ठिकाणाहूनही गडावर जाता येते. कुडाळ हायस्कूलपासून जरा पुढे आल्यावर शहरापेक्षा थोडे उंचीवर एका उंच सपाट टेकडीवर वसलेले जागृत देवस्थान म्हणजे श्री गवळदेव. वेंगुर्ला रोडवर आज कुडाळच्या एमआयडीसी विभागाची जेथून सुरवात होते ती टेकडीच या दैवताचे तीर्थक्षेत्र झाली आहे. कुडाळची पर्वती म्हणून या टेकडीचा मोठ्या अभिमानाने कुडाळवासीय गौरव करतात. तसेच आणखी पुढे आल्यावर राऊळ महाराजांच्या समाधीमुळे प्रसिद्ध पावलेला पिंगुळी गाव आहे. तेथे ठाकर समाजाने लोककलांचे जतन केले आहे. "कळसूत्री बाहुली' या कलेबरोबरच गोंधळ, पांगुळ, चर्म बाहुल्या, पोवाडा, पिंगळी, राधानृत्य, शॅडोपपेट आदी लोककला मला तेथे पाहता आल्या.कुडाळच्या दुसऱ्या बाजूला हळदीचे नेरूर येथे स्वयंभू जटाशंकर मंदिर आणि गणपती मंदिर ही पुरातन मंदिरे आहेत. मंदिराच्या एका बाजूला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याची हद्द असलेला हणमंते घाटाचा पहाडासारखा कडा, पश्‍चिमेला गावावर टेहळणी करण्यासाठी पुढे सरसावलेले रांगणागडाचे टोक, गडावरून खाली उतरत आलेली सह्याद्री पर्वताची विशाल रांग, अशा इंग्रजी "यू' आकाराच्या खोबणीत विसावलेला हा परिसर बाळा मेस्त्रींसोबत मी अनुभवला आहे. मंदिर परिसरात बारमाही वाहणारे छोटे-छोटे पाण्याचे प्रवाह आहेत. तेथेही मनसोक्त भटकंती मला करता आली. राहत होतो त्या तेर्सेबांबर्डे गावालगत झाराप हे गाव. राष्ट्रीय महामार्गावरच्या या गावाचे नाव मी गोव्यात असतानाही मूर्तींच्या संदर्भात ऐकले होते. कांता बाणे यांच्यासमवेत मी तो गाव पाहिला. गावात दीडशे ते दोनशे विविध आकाराचे मोठ-मोठे दगड पाहावयास मिळतात. झाराप गाव दगड-धोंड्यांचा, चिकण मातीचा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी मातीची मजबूत, टिकाऊ व नक्षीदार भांडी बनविली जायची. ही भांडी बैलगाडीने चिपळूणमार्गे वसई-मुंबई, दक्षिणेस गोव्यापर्यंत नेली जात. कुंभारवाडीत म्हारकटेश्‍वर मंदिराजवळ एकावर एक नैसर्गिकरीत्या रचलेले मोठ-मोठे दगड लक्षवेधी आहेत. वरचीवाडीत "चाळोबा' देवस्थान आहे. छोटीशी देवीची घुमटी भल्या मोठ्या दगडाच्या खालीच आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे मोठे दगड एकावर एक रचून वर्षानुवर्षे ठेवले आहेत. तो परिसर त्यामुळेच मनात कायमचा घर करून गेला आहे.

Thursday, April 21, 2011

असा आहे आडिवरेचा परिसर

जैतापूर येथे झालेल्या गोळीबारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे परिसर चर्चेत आला आहे. तो गाव आणि परिसर मी कित्येकदा हिंडलो आहे. राजापूरपासून विसेक किलोमीटरवरील आडिवरे येथील सदानंद पुंडपाळ यांच्याशी माझा विशेष स्नेह. रत्नागिरीहून मोटारसायकलने सावंतवाडी येथे जाताना मी मुद्दामहून आडिवरेमार्गे जात असे.पुंडपाळ यांच्यासोबत त्या परिसरात फिरताना सध्या भग्नावस्थेत असलेल्या पण एकेकाळी समृद्ध असलेल्या आडिवरेचे दृश्‍य डोळ्यासमोर तरळून जायचे. त्या परिसरात कातळ फोडून केलेली हापूस आंब्याची लागवड हे आणखीन एक वैशिष्ट्य. त्या आंब्याची चवच वेगळी. ती चाखण्यासाठीही मेमध्ये भर उन्हात घामाच्या धारा लागत असतानाही मोटारसायकलचे चाक आडिवरेकडे वळायचे. या आडिवरेजवळ नाटे आहे. तेथे असलेल्या यशवंत गडावरही आम्ही गेलो होतो. हा गड शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजारामाने बांधला, असे सांगितले जात असले, तरी तो शिवाजी महाराजांनीच बांधला आहे. त्याबाबतची माहिती आपण फार पूर्वी पत्की घराण्याच्या मोडी कागदपत्रांमध्ये वाचल्याचे गडाचे सध्याचे वारसदार विश्‍वनाथ रघुनाथ पत्की यांनी एकदा सांगितले होते. हा गड बांधत असताना शिवाजी महाराजांना इतरत्रही यश प्राप्ती झाली आणि म्हणूनच या गडाचे नाव यशवंतगड असे ठेवण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. स्वतःचे सुसज्ज आरमार उभारणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते. त्यामुळेच हा गड शिवाजी महाराजांनीच बांधला असावा या जाणकारांच्या मताला पुष्टी मिळते. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज इथे व्यापारासाठी आले आणि त्यांनी इथल्या राजकारणात ढवळाढवळ करण्यास सुरवात केली. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला असताना त्याला राजापूरच्या टोपीकरांनी तोफा पुरवल्या होत्या. त्याचा राजांना राग होताच. त्याची त्यांनी नंतर सव्याज फेड केली हा भाग वेगळा. राजापूर ही मोठी व्यापारी पेठ होती. राजापूर या ब्रॅंडखाली मोठी उलाढाल होत होती. त्यांचा सर्व माल गलबतातून जैतापूर खाडीतून येत-जात होता. या खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी बंदरानजीकच यशवंतगड असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते. पूर्णगडचा छोटेखानी किल्ला जिंकण्यासाठी महाराज यामार्गे गेल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. याच दरम्यान मार्च 1661 मध्ये त्यांनी कशेळीच्या कनकादित्य मंदिराला भेट दिल्याची नोंद उपलब्ध आहे. जैतापूर खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी या जुन्या व सुरक्षित बंदराजवळ सात एकर जागेवर गडाची उभारणी करण्यात आली असून सभोवती उंच व सुमारे दहा फूट रुंदीची अभेद्य तटबंदी आहे. तटबंदीतच आठ बुरूज असून एक बुरूज समुद्रालगत आहे, तर हनुमान बुरूज सर्वांत भक्कम असून तिथून पश्‍चिमेला आंबोळगड व अरबी समुद्र, तर दक्षिणेला विजयदुर्ग व उत्तरेला पूर्णगडपर्यंतचा मुलूख दिसतो. त्यावर टेहळणी करण्यासाठी व संदेश वहनासाठीही त्याचा वापर करण्यात येत होता. तटबंदीला पायऱ्यांचा रस्ता आहे. तटबंदीच्या आत बालेकिल्ला असून त्याला तिन्ही बाजूंनी खंदक आहे. जवळच सुमारे 80 फूट खोल विहीर आहे. प्रवेशद्वारे कमानीच्या आकाराची असून संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडातील आहे. हा स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुनाच मानावा लागेल. याच गावचे सुपुत्र आणि सर्जन (कै.) डॉ. रघुनाथ सीताराम पत्की हे पहिल्या महायुद्धाच्या वेळी लष्करात डॉक्‍टर होते. युद्धातील कामगिरी आणि पंचम जॉर्ज यांच्यावर उपचार करण्यासाठी भारतातून पाठवलेल्या डॉक्‍टरांच्या पथकातही ते होते. हे विचारात घेऊन पंचम जॉर्जने 1921 मध्ये हा किल्ला आणि विजयदुर्ग, पूर्णगड, जैतापूर, प्रभानवल्ली आदी 17 ठिकाणी त्यांना इनामी जमिनी दिल्या. त्या वेळी भेट मिळालेली तलवार त्यांच्या प्रभानवल्ली येथील घरात आहे, असे त्यांचे दत्तक पुत्र विश्‍वनाथ पत्की यांनी सांगितले. आता बऱ्याच जमिनी कुळकायद्याने गेल्या. पण गडावर आजही सुमारे 100 आंब्याची कलमे आणि सागाची हजारो झाडे आहेत. काळ बदलला. विश्‍वनाथ पत्कीही नोकरीनिमित्त मुंबईला गेले. त्यांचा मुलगा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. विश्‍वनाथ पत्कींचे शालेय शिक्षण जैतापूर हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यांचे बालपण या किल्ल्यात गेले. त्यामुळे ते इथे वास्तूच्या ओढीने येतात. काही काळ राहतात आणि भूतकाळात हरवतात. आडिवरेला पूर्वीच्या काळी संपन्न बाजारपेठ होती. त्याचे पुरावेही जागोजागी विखुरलेले आढळतात. पूर्वी शेती हाच या भागाचा मुख्य व्यवसाय होता. सरकारने फलोत्पादनाला शंभर टक्के अनुदानाची योजना राबविली आणि कातळावर आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. त्या आंब्यालाही वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरी, देवगड हापूस मागोमाग आडिवरे हापूस प्रसिद्ध झाला तर आश्‍चर्य वाटायला नको.

Monday, April 18, 2011

पीर भद्रेश्वर

पीर भद्रेश्वर नाव ऐकून काहीच बोध होत नाही. हिंदूंचे मंदिर की आणखी काही असा प्रश्‍न डोळ्यांसमोर येतो. सर्वसामान्य भाविकांना सरसकट तेथे जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे गूढतेचे वलय या वास्तूभोवती आहे. मलाही या वास्तूचे आणि त्या परिसराचे कुतूहल वाटत आले आहे. काही प्रमाणात का होईना गेल्या महिन्यात ते कुतूहल शमले. याचे कारण म्हणजे पीर भद्रेश्वरला भेट देता आली, तीही कॅमेऱ्यासकट. एरवी पीर भद्रेश्वरपासून वीस किलोमीटर अलीकडेच लष्कराच्या नाक्‍यावर कॅमेरा जमा करावा लागतो व येताना तो परत घ्यावा लागतो. फक्त मनातच आठवणी साठवाव्या लागतात. तेथे मला लष्कराच्या बसने जाता आले. डोंगराच्या माथ्यावर पोचल्यावर छोटेखानी असे मंदिर दृष्टीस पडले. एका वेळी गाभाऱ्यात सहा माणसे कशीबशी दाटीवाटीने राहू शकतील असे ते सुबक मंदिर मनाला भावल्यावाचून राहिले नाही. त्यावर कोरलेला शिलालेख वाचताना आपल्या जवानांनी प्राणाची बाजू लावून हा परिसर पाकिस्तानकडून कसा जिंकून घेतला आणि मंदिराची पुनर्उभारणी कशी केली याची माहिती मिळाली. भारतीय लष्कराच्या दृष्टीने हे तसे महत्त्वाचे ठाणे. कारण शंभर मीटरवर दरीत पाकव्याप्त काश्‍मीर सुरू. त्यामुळे इन्सास व एके 47 रायफली घेतलेल्या जवांनाचा खडा पहारा तेथे आहे.सहज म्हणून मी दुर्बीण घेऊन दरीत पाहिले असता समोरा समोर दोन चौक्‍या दिसल्या. त्या मला पाकिस्तानी चौक्‍या वाटल्या. मी कुतूहलाने विचारणा केल्यावर एक आपली व एक त्यांची चौकी. दोन्हींत केवळ नव्वद मीटरचे अंतर अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानने आता जाणीवपूर्वक सीमावर्ती भागात लोकवस्ती वाढविण्यावर भर दिल्याचे दिसून आले. नवी घरे त्यांच्या बाजूने उभी राहत आहेत. या वस्तीमागून भारताच्या बाजूने मारा करायचा आणि भारताने प्रत्युत्तर दिले की नागरी वस्तीवर हल्ला केल्याचा कांगावा करायचा असा सरळ हेतू यामागे आहे.या भद्रेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत तुरळक वस्ती दिसते. शेळ्या चरायला घेऊन जाणारे गावकरी दृष्टीस पडतात. लष्करी वाहने पाहण्याची सवय असलेले हे लोक एखादे निराळे वाहन दिसले की पाहतच राहतात. कधी तरी हात उंचावून प्रतिसादही देतात. वाटेत प्रत्येक दहा मीटरवर खडा पहारा आहे.चौक्‍यांची तर गणतीच नाही. घुसखोर दहशतवादी सीमावर्ती भागातून मुख्य भागात पोचू नये यासाठी जंगलातील प्रत्येक इंचावर नजर असण्याची खास व्यवस्थाही आहे.दक्ष राजावर शिवपुत्र भद्रेश्वराने विजय मिळविल्याच्या स्मरणार्थ कनिष्क राजाने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख इतिहासात आहे. शिवाने जटा दगडावर आपटून या भद्रेश्वराची निर्मिती केली अशी श्रद्धा आहे. दक्षावर विजय मिळविल्यानंतर हिमालयात परत जाताना भद्रेश्वराने या मंदिराच्या ठिकाणीच विश्रांती घेतली होती असेही शिलालेखावर म्हटले आहे.1947-48 मध्ये पाकिस्तानने मारा करून मंदिर उद्‌ध्वस्त केले होते. या भागावरही पाकिस्तानने कब्जा केला होता. त्या वेळीच वीर भद्रेश्वराचे पीर भद्रेश्वर असे नामकरणही झाले. 20 ऑक्‍टोबर 1948 ला भारताने हा प्रदेश पाकिस्तानकडून जिंकून घेतला. कर्नल प्रेम प्रताप क्षत्रिय व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मंदिराची उभारणी केली. अलीकडेच मंदिरात शिवलिंगाची पुनर्स्थापनाही करण्यात आली आहे. सुमारे चार हजार फुटावरील हा परिसर मनात घर केल्याशिवाय राहत नाही.या भद्रेश्वराच्या मंदिराच्या परिसरात घंटांच्या माळा आहेत. या मंदिरात घंटा बांधून केलेला नवस पुरा होतो अशी श्रद्धा आहे. त्यासाठी मंदिरातच घंटा विकत मिळण्याची व्यवस्था आहे. फक्त मंदिरापर्यंत पोचण्यासाठी लष्कराची खास परवानगी तेवढी हवी.