जपानमधील इलेक्ट्रॉनिक टोल वसुली व्यवस्था तब्बल ३८ तास बंद पडली. त्यामुळे टोलनाके खुले करण्यात आले आणि वाहनचालकांना कोणताही टोल न भरता पुढे जाता आले. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर मात्र २४ हजारांहून अधिक वाहनचालकांनी स्वतःहून ऑनलाइन टोल भरला. पैसे न भरता सहज निसटण्याची संधी उपलब्ध असतानाही त्यांनी ती घेतली नाही. ही घटना केवळ जपानमधील टोल व्यवस्थेची गोष्ट नाही; ती समाजाच्या नैतिक आरोग्याचे दर्शन घडवणारी आहे
कायदा, नियम आणि दंड यांची भीती असल्यामुळे आपण प्रामाणिक राहतो की अंतःकरण सांगते म्हणून? हा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. एखाद्या चौकात पोलीस नसतील, रस्त्यावर कॅमेरा नसेल, कर भरण्यावर तातडीने कोणाची नजर नसेल किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल लगेच शिक्षा होणार नसेल, तर आपण काय करतो, यावर समाजाची खरी संस्कृती ठरते.
जपानी समाजात ‘आपल्यामुळे इतरांचे नुकसान होऊ नये’ ही भावना खोलवर रुजलेली दिसते. राष्ट्रप्रेम म्हणजे केवळ ध्वजाला सलाम करणे, घोषवाक्ये देणे किंवा राष्ट्रीय सण साजरे करणे नव्हे. आपल्या वाट्याची जबाबदारी कोणत्याही दबावाशिवाय पार पाडणे, सार्वजनिक संपत्तीला स्वतःच्या संपत्तीप्रमाणे जपणे आणि नियम पाळणे हेही राष्ट्रप्रेमच आहे.
आपल्याकडे मात्र अनेकदा नियम म्हणजे चुकवण्याची गोष्ट आणि पळवाट म्हणजे हुशारी मानली जाते. वाहतुकीचा नियम मोडून पोलिसांना चकवण्यात, कर वाचवण्यात किंवा सरकारी सुविधांचा गैरवापर करण्यात काही जण अभिमान मानतात. ‘सगळेच करतात’ हा त्यासाठीचा सोयीस्कर युक्तिवाद असतो. पण प्रत्येक जण दुसऱ्याच्या चुकीचे अनुकरण करीत राहिला, तर प्रामाणिकपणा हा अपवाद ठरेल आणि अप्रामाणिकपणा हीच व्यवस्था बनेल.
जपानने आपल्याला आरसा दाखवला आहे. विकास केवळ रुंद रस्ते, वेगवान रेल्वे, आधुनिक तंत्रज्ञान आणि गगनचुंबी इमारतींनी होत नाही. देशाची खरी प्रगती नागरिकांच्या चारित्र्यात, सार्वजनिक शिस्तीत आणि न दिसणाऱ्या ठिकाणी घेतलेल्या योग्य निर्णयांत असते.
कारण देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक चौकात पोलीस उभे करण्याची गरज नसते; प्रत्येक नागरिकाच्या मनात एक जागा झालेला प्रहरी पुरेसा असतो.
No comments:
Post a Comment