Friday, April 22, 2011

कुडाळची घोडेबाव आणि बरेच काही

1998-99 मध्ये सावंतवाडीला असताना मी तेर्सेबांबर्डे येथे राहत होतो. तेथून कुडाळ सहा किलोमीटरवर. कुडाळला पत्रकार अर्जुन राणे यांनी सांगेपर्यंत कुडाळ म्हणजे काय ते मला कळले नव्हते. कुडाळचा पट राणे, देवेंद्र वालावलकर, नरेंद्र खोबरेकर, रवी गावडे यांनी उलगडून दाखविला.अकराव्या शतकापर्यंत कुडाळ प्रांताच्या राजधानीचे हे ठिकाण होते. सध्या येथे असलेली न्यायालयाची इमारत म्हणजे भुईकोट किल्ला होय. शिवाजी महाराजांनी बांधलेली ऐतिहासिक घोडबाव विहीर शहरात बसस्थानकासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर आहे. तेथेही मी अनेकदा राहिलो. तेथे आबा शिरसाट यांच्याशीही अनेकदा माझी कुडाळ व अनेक विषयांवर अनेकदा चर्चा होत असे.कुडाळपासून 20 कि.मी. अंतरावर नारूर गाव आहे. तेथून रांगणागडावर जाण्यासाठी दीड ते दोन तास पायी जावे लागते. तेथेही जाण्यासाठी पाय दुखेपर्यंत (आठवडाभरपर्यंत) मी चाललो. वाडोस, पांग्रड या ठिकाणाहूनही गडावर जाता येते. कुडाळ हायस्कूलपासून जरा पुढे आल्यावर शहरापेक्षा थोडे उंचीवर एका उंच सपाट टेकडीवर वसलेले जागृत देवस्थान म्हणजे श्री गवळदेव. वेंगुर्ला रोडवर आज कुडाळच्या एमआयडीसी विभागाची जेथून सुरवात होते ती टेकडीच या दैवताचे तीर्थक्षेत्र झाली आहे. कुडाळची पर्वती म्हणून या टेकडीचा मोठ्या अभिमानाने कुडाळवासीय गौरव करतात. तसेच आणखी पुढे आल्यावर राऊळ महाराजांच्या समाधीमुळे प्रसिद्ध पावलेला पिंगुळी गाव आहे. तेथे ठाकर समाजाने लोककलांचे जतन केले आहे. "कळसूत्री बाहुली' या कलेबरोबरच गोंधळ, पांगुळ, चर्म बाहुल्या, पोवाडा, पिंगळी, राधानृत्य, शॅडोपपेट आदी लोककला मला तेथे पाहता आल्या.कुडाळच्या दुसऱ्या बाजूला हळदीचे नेरूर येथे स्वयंभू जटाशंकर मंदिर आणि गणपती मंदिर ही पुरातन मंदिरे आहेत. मंदिराच्या एका बाजूला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याची हद्द असलेला हणमंते घाटाचा पहाडासारखा कडा, पश्‍चिमेला गावावर टेहळणी करण्यासाठी पुढे सरसावलेले रांगणागडाचे टोक, गडावरून खाली उतरत आलेली सह्याद्री पर्वताची विशाल रांग, अशा इंग्रजी "यू' आकाराच्या खोबणीत विसावलेला हा परिसर बाळा मेस्त्रींसोबत मी अनुभवला आहे. मंदिर परिसरात बारमाही वाहणारे छोटे-छोटे पाण्याचे प्रवाह आहेत. तेथेही मनसोक्त भटकंती मला करता आली. राहत होतो त्या तेर्सेबांबर्डे गावालगत झाराप हे गाव. राष्ट्रीय महामार्गावरच्या या गावाचे नाव मी गोव्यात असतानाही मूर्तींच्या संदर्भात ऐकले होते. कांता बाणे यांच्यासमवेत मी तो गाव पाहिला. गावात दीडशे ते दोनशे विविध आकाराचे मोठ-मोठे दगड पाहावयास मिळतात. झाराप गाव दगड-धोंड्यांचा, चिकण मातीचा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी मातीची मजबूत, टिकाऊ व नक्षीदार भांडी बनविली जायची. ही भांडी बैलगाडीने चिपळूणमार्गे वसई-मुंबई, दक्षिणेस गोव्यापर्यंत नेली जात. कुंभारवाडीत म्हारकटेश्‍वर मंदिराजवळ एकावर एक नैसर्गिकरीत्या रचलेले मोठ-मोठे दगड लक्षवेधी आहेत. वरचीवाडीत "चाळोबा' देवस्थान आहे. छोटीशी देवीची घुमटी भल्या मोठ्या दगडाच्या खालीच आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे मोठे दगड एकावर एक रचून वर्षानुवर्षे ठेवले आहेत. तो परिसर त्यामुळेच मनात कायमचा घर करून गेला आहे.

Thursday, April 21, 2011

असा आहे आडिवरेचा परिसर

जैतापूर येथे झालेल्या गोळीबारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे परिसर चर्चेत आला आहे. तो गाव आणि परिसर मी कित्येकदा हिंडलो आहे. राजापूरपासून विसेक किलोमीटरवरील आडिवरे येथील सदानंद पुंडपाळ यांच्याशी माझा विशेष स्नेह. रत्नागिरीहून मोटारसायकलने सावंतवाडी येथे जाताना मी मुद्दामहून आडिवरेमार्गे जात असे.पुंडपाळ यांच्यासोबत त्या परिसरात फिरताना सध्या भग्नावस्थेत असलेल्या पण एकेकाळी समृद्ध असलेल्या आडिवरेचे दृश्‍य डोळ्यासमोर तरळून जायचे. त्या परिसरात कातळ फोडून केलेली हापूस आंब्याची लागवड हे आणखीन एक वैशिष्ट्य. त्या आंब्याची चवच वेगळी. ती चाखण्यासाठीही मेमध्ये भर उन्हात घामाच्या धारा लागत असतानाही मोटारसायकलचे चाक आडिवरेकडे वळायचे. या आडिवरेजवळ नाटे आहे. तेथे असलेल्या यशवंत गडावरही आम्ही गेलो होतो. हा गड शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजारामाने बांधला, असे सांगितले जात असले, तरी तो शिवाजी महाराजांनीच बांधला आहे. त्याबाबतची माहिती आपण फार पूर्वी पत्की घराण्याच्या मोडी कागदपत्रांमध्ये वाचल्याचे गडाचे सध्याचे वारसदार विश्‍वनाथ रघुनाथ पत्की यांनी एकदा सांगितले होते. हा गड बांधत असताना शिवाजी महाराजांना इतरत्रही यश प्राप्ती झाली आणि म्हणूनच या गडाचे नाव यशवंतगड असे ठेवण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. स्वतःचे सुसज्ज आरमार उभारणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते. त्यामुळेच हा गड शिवाजी महाराजांनीच बांधला असावा या जाणकारांच्या मताला पुष्टी मिळते. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज इथे व्यापारासाठी आले आणि त्यांनी इथल्या राजकारणात ढवळाढवळ करण्यास सुरवात केली. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला असताना त्याला राजापूरच्या टोपीकरांनी तोफा पुरवल्या होत्या. त्याचा राजांना राग होताच. त्याची त्यांनी नंतर सव्याज फेड केली हा भाग वेगळा. राजापूर ही मोठी व्यापारी पेठ होती. राजापूर या ब्रॅंडखाली मोठी उलाढाल होत होती. त्यांचा सर्व माल गलबतातून जैतापूर खाडीतून येत-जात होता. या खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी बंदरानजीकच यशवंतगड असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते. पूर्णगडचा छोटेखानी किल्ला जिंकण्यासाठी महाराज यामार्गे गेल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. याच दरम्यान मार्च 1661 मध्ये त्यांनी कशेळीच्या कनकादित्य मंदिराला भेट दिल्याची नोंद उपलब्ध आहे. जैतापूर खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी या जुन्या व सुरक्षित बंदराजवळ सात एकर जागेवर गडाची उभारणी करण्यात आली असून सभोवती उंच व सुमारे दहा फूट रुंदीची अभेद्य तटबंदी आहे. तटबंदीतच आठ बुरूज असून एक बुरूज समुद्रालगत आहे, तर हनुमान बुरूज सर्वांत भक्कम असून तिथून पश्‍चिमेला आंबोळगड व अरबी समुद्र, तर दक्षिणेला विजयदुर्ग व उत्तरेला पूर्णगडपर्यंतचा मुलूख दिसतो. त्यावर टेहळणी करण्यासाठी व संदेश वहनासाठीही त्याचा वापर करण्यात येत होता. तटबंदीला पायऱ्यांचा रस्ता आहे. तटबंदीच्या आत बालेकिल्ला असून त्याला तिन्ही बाजूंनी खंदक आहे. जवळच सुमारे 80 फूट खोल विहीर आहे. प्रवेशद्वारे कमानीच्या आकाराची असून संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडातील आहे. हा स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुनाच मानावा लागेल. याच गावचे सुपुत्र आणि सर्जन (कै.) डॉ. रघुनाथ सीताराम पत्की हे पहिल्या महायुद्धाच्या वेळी लष्करात डॉक्‍टर होते. युद्धातील कामगिरी आणि पंचम जॉर्ज यांच्यावर उपचार करण्यासाठी भारतातून पाठवलेल्या डॉक्‍टरांच्या पथकातही ते होते. हे विचारात घेऊन पंचम जॉर्जने 1921 मध्ये हा किल्ला आणि विजयदुर्ग, पूर्णगड, जैतापूर, प्रभानवल्ली आदी 17 ठिकाणी त्यांना इनामी जमिनी दिल्या. त्या वेळी भेट मिळालेली तलवार त्यांच्या प्रभानवल्ली येथील घरात आहे, असे त्यांचे दत्तक पुत्र विश्‍वनाथ पत्की यांनी सांगितले. आता बऱ्याच जमिनी कुळकायद्याने गेल्या. पण गडावर आजही सुमारे 100 आंब्याची कलमे आणि सागाची हजारो झाडे आहेत. काळ बदलला. विश्‍वनाथ पत्कीही नोकरीनिमित्त मुंबईला गेले. त्यांचा मुलगा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. विश्‍वनाथ पत्कींचे शालेय शिक्षण जैतापूर हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यांचे बालपण या किल्ल्यात गेले. त्यामुळे ते इथे वास्तूच्या ओढीने येतात. काही काळ राहतात आणि भूतकाळात हरवतात. आडिवरेला पूर्वीच्या काळी संपन्न बाजारपेठ होती. त्याचे पुरावेही जागोजागी विखुरलेले आढळतात. पूर्वी शेती हाच या भागाचा मुख्य व्यवसाय होता. सरकारने फलोत्पादनाला शंभर टक्के अनुदानाची योजना राबविली आणि कातळावर आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. त्या आंब्यालाही वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरी, देवगड हापूस मागोमाग आडिवरे हापूस प्रसिद्ध झाला तर आश्‍चर्य वाटायला नको.

Monday, April 18, 2011

पीर भद्रेश्वर

पीर भद्रेश्वर नाव ऐकून काहीच बोध होत नाही. हिंदूंचे मंदिर की आणखी काही असा प्रश्‍न डोळ्यांसमोर येतो. सर्वसामान्य भाविकांना सरसकट तेथे जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे गूढतेचे वलय या वास्तूभोवती आहे. मलाही या वास्तूचे आणि त्या परिसराचे कुतूहल वाटत आले आहे. काही प्रमाणात का होईना गेल्या महिन्यात ते कुतूहल शमले. याचे कारण म्हणजे पीर भद्रेश्वरला भेट देता आली, तीही कॅमेऱ्यासकट. एरवी पीर भद्रेश्वरपासून वीस किलोमीटर अलीकडेच लष्कराच्या नाक्‍यावर कॅमेरा जमा करावा लागतो व येताना तो परत घ्यावा लागतो. फक्त मनातच आठवणी साठवाव्या लागतात. तेथे मला लष्कराच्या बसने जाता आले. डोंगराच्या माथ्यावर पोचल्यावर छोटेखानी असे मंदिर दृष्टीस पडले. एका वेळी गाभाऱ्यात सहा माणसे कशीबशी दाटीवाटीने राहू शकतील असे ते सुबक मंदिर मनाला भावल्यावाचून राहिले नाही. त्यावर कोरलेला शिलालेख वाचताना आपल्या जवानांनी प्राणाची बाजू लावून हा परिसर पाकिस्तानकडून कसा जिंकून घेतला आणि मंदिराची पुनर्उभारणी कशी केली याची माहिती मिळाली. भारतीय लष्कराच्या दृष्टीने हे तसे महत्त्वाचे ठाणे. कारण शंभर मीटरवर दरीत पाकव्याप्त काश्‍मीर सुरू. त्यामुळे इन्सास व एके 47 रायफली घेतलेल्या जवांनाचा खडा पहारा तेथे आहे.सहज म्हणून मी दुर्बीण घेऊन दरीत पाहिले असता समोरा समोर दोन चौक्‍या दिसल्या. त्या मला पाकिस्तानी चौक्‍या वाटल्या. मी कुतूहलाने विचारणा केल्यावर एक आपली व एक त्यांची चौकी. दोन्हींत केवळ नव्वद मीटरचे अंतर अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानने आता जाणीवपूर्वक सीमावर्ती भागात लोकवस्ती वाढविण्यावर भर दिल्याचे दिसून आले. नवी घरे त्यांच्या बाजूने उभी राहत आहेत. या वस्तीमागून भारताच्या बाजूने मारा करायचा आणि भारताने प्रत्युत्तर दिले की नागरी वस्तीवर हल्ला केल्याचा कांगावा करायचा असा सरळ हेतू यामागे आहे.या भद्रेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत तुरळक वस्ती दिसते. शेळ्या चरायला घेऊन जाणारे गावकरी दृष्टीस पडतात. लष्करी वाहने पाहण्याची सवय असलेले हे लोक एखादे निराळे वाहन दिसले की पाहतच राहतात. कधी तरी हात उंचावून प्रतिसादही देतात. वाटेत प्रत्येक दहा मीटरवर खडा पहारा आहे.चौक्‍यांची तर गणतीच नाही. घुसखोर दहशतवादी सीमावर्ती भागातून मुख्य भागात पोचू नये यासाठी जंगलातील प्रत्येक इंचावर नजर असण्याची खास व्यवस्थाही आहे.दक्ष राजावर शिवपुत्र भद्रेश्वराने विजय मिळविल्याच्या स्मरणार्थ कनिष्क राजाने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख इतिहासात आहे. शिवाने जटा दगडावर आपटून या भद्रेश्वराची निर्मिती केली अशी श्रद्धा आहे. दक्षावर विजय मिळविल्यानंतर हिमालयात परत जाताना भद्रेश्वराने या मंदिराच्या ठिकाणीच विश्रांती घेतली होती असेही शिलालेखावर म्हटले आहे.1947-48 मध्ये पाकिस्तानने मारा करून मंदिर उद्‌ध्वस्त केले होते. या भागावरही पाकिस्तानने कब्जा केला होता. त्या वेळीच वीर भद्रेश्वराचे पीर भद्रेश्वर असे नामकरणही झाले. 20 ऑक्‍टोबर 1948 ला भारताने हा प्रदेश पाकिस्तानकडून जिंकून घेतला. कर्नल प्रेम प्रताप क्षत्रिय व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मंदिराची उभारणी केली. अलीकडेच मंदिरात शिवलिंगाची पुनर्स्थापनाही करण्यात आली आहे. सुमारे चार हजार फुटावरील हा परिसर मनात घर केल्याशिवाय राहत नाही.या भद्रेश्वराच्या मंदिराच्या परिसरात घंटांच्या माळा आहेत. या मंदिरात घंटा बांधून केलेला नवस पुरा होतो अशी श्रद्धा आहे. त्यासाठी मंदिरातच घंटा विकत मिळण्याची व्यवस्था आहे. फक्त मंदिरापर्यंत पोचण्यासाठी लष्कराची खास परवानगी तेवढी हवी.

Sunday, April 17, 2011

देखणे गाव आयी

गोव्यातील साखळीहून दोडामार्गला जाताना आयी हे गाव आहे. बांद्यापासून काही किलोमीटरवर असलेले हे गाव आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे. पोर्तुगीज काळातील गजबजलेली व्यापारी बाजारपेठ अशी ओळखही आयी गावाला आहे. तेथे आजही पोर्तुगीजकालीन इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या कित्येक वास्तूही आहेत.पर्ये येथून परतताना एक दिवस सहज उजवीकडे वळलेला हा रस्ता कुठे जातो असा प्रश्‍न पडला नि मी आयी येथे पोचलो.पोतुर्गिजांची गोव्यावर सत्ता असताना ब्रिटिशांच्या ताब्यातील व नंतर मुक्त भारताच्या हद्दीतून अनेक गोष्टी गोव्यात आणल्या जात. या गोष्टी चोरट्या मार्गाने आणण्यासाठी आयीचा वापर होत असे. चणे, वाटाणे, गूळ, चवळी, छत्र्या, कपडे, अगरबत्ती आणल्या जात असे मला तेथे कळले. दोडामार्गच्या बाजारपेठेतून बैलगाडीतून माल आयी येथे आणला जायचा. दोडामार्गातून एका वेळी 25 ते 50 बैलगाड्या सुटायच्या. दोडामार्ग, तळेखोल, कीटवाडी असा प्रवास करीत रात्री सुटलेल्या गाड्या पहाटेपर्यंत गावात पोचायच्या. तेथे सगळा माल उतरून ठेवला जायचा. उतरलेला माल रात्री सीमापार करून गोव्यात नेला जायचा. रात्रभरात 50 ते 60 कामगार मालाच्या गोणी सीमापार नेऊन द्यायचे. तेथे पुन्हा दुसरे कामगार हजर असायचे. इकडचा माल तिकडे जाऊ नये, यासाठी पोर्तुगिजांनी माटणे गावापासून रावण गावापर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर अंतर भरेल एवढे लोखंडी कुंपणही उभारले होते. त्याचे अवशेषही मला पाहता आले. तारेच्या पलीकडे पोर्तुगिजांचा, तर अलीकडे कस्टमच्या पहारेकऱ्यांचा पहारा असायचा. अशा या वेगळ्या बाजारपेठेच्या खुणा आजही आपले अस्तित्व जोपासत असून काही इमारती पडक्‍या, तर काही दिमाखात उभ्या आहेत. गोव्यातून ब्लेड, लवंग, सुपारी, सुके मासे याच पद्धतीने आणले जायचे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा बाजार बंद झाला, तरी त्याच्या खुणा इतिहास अभ्यासकांसाठी मागे राहिल्या आहेत. दोडामागर्मध्ये एकदा भटकंती करत असताना पारगडविषयी कळले. तेथील गावस नावाचे गृहस्थ मला तेथे नेण्यासही तयार झाले. पारगडाची भौगोलिक रचना अशी की, गोव्यातील पोर्तुगीज, सावंतवाडीचे खेम-सावंत यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग करण्यात आला. चंद्र-सूर्य असेपर्यंत या गडाची राखण करायची, अशी सनद (ताम्रपट) शिवाजी महाराजांनी दिली आणि अखेरपर्यंत हा गड अजिंक्‍य राहिला. 1857 च्या गडकऱ्यांच्या बंडातही हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ शकला नाही. उंच ताशीव कडे, पायथ्याला घनदाट जंगल आणि आकाशाशी स्पर्धा करणारी उंची यामुळे हा गड आपले अभेद्यपण टिकवून आहे.चंदगड-दोडामार्ग-गोवा रस्त्यावर पारगडकडे जाणारा फाटा मिळतो. तेथून पारगडला जाता येते. दोडामार्ग तालुक्‍यातील मोर्ले गावातून मिरवेलमार्गेही पारगडला जाता येते. त्यासाठी काही तास चालत जावे लागते. आम्ही दोन्ही बाजूने गडावर चढाई केली. दाट धुक्‍यात हरवलेली गर्द झाडी, घोंगावणारा गार वारा, आभाळ आणि अरण्य यांची एकमेकांना स्पर्श करण्यासाठी चाललेली स्पर्धा आणि निसर्गाचे अनेक विलोभनीय विभ्रम पारगडावरून पाहायला मिळाले. गडावर शिवरायांच्या वंशजांचे आजही अस्तित्व आहे. त्यांची घरे तीन-साडेतीनशे वर्षे तेथे उभी आहेत. मालुसरे, शेलार, झेंडे, शिंदे, कदम, नाईक, डांगे, जगताप, सूर्यवंशी, चव्हाण, माळवे, कुंडले, थोरात, जाधव, कारखानीस, फडणीस, सबनीस, मणेरकर ही गडावरची मूळ घराणी. गडावर पद्मावती तलाव, अन्य तीन बांधीव दगडाचे तलाव, याशिवाय अठरा विहिरी आहेत. गडाच्या पश्‍चिमेला तीन बुरूज आहेत. फडणीस बुरूज, भालेकर बुरूज आणि शेलार बुरूज अशी त्यांची ओळख आहे. शिवाय भांडे, झेंडे माळवे हे अन्य तीन बुरूज आणि पूर्व-पश्‍चिम-उत्तरेला भक्कम तटबंदी आहे.

Saturday, April 16, 2011

एक पणती त्यांच्यासाठी...

समाजाचा एक दखलपात्र घटक निराधार आहे ही जाणीवच मन बधीर करणारी आहे. बाजारपेठेत पैसे मोडताना अशांचा चेहरा डोळ्यासमोर निश्‍चितपणे आणायला हवा. या वर्षाच्या बजेटमधील काही वाटा त्यांच्यासाठी, याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. दान फक्त धनिकांनीच करावे हे मनातून काढून टाका. ....
काय काय घेतले या गुढी पाडव्याला?..नवे कपडे, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज की नवी गाडी? वर्षातून एकदा येणारा हा उत्सव झगमगाटात साजरा करायचाच असतो. सर्वदूर लखलखाट, मिणमिणत्या पणतीच्या प्रकाशात आपल्या आप्तस्वकीयांच्या आरोग्याची शुभकामना करायची. त्यांना लक्ष्मीप्रसाद मिळावा, म्हणून शुभेच्छा द्यायच्या... हे सारे आपण आपल्यासाठी करणार, नाही का? पण... पण आपल्यातीलच काही दुर्दैवी जीव, ज्यांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळणे कठीण असते, त्यांनाही आपल्यासारख्याच भावना आहेत. त्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नसले तरी समाजबांधव म्हणून त्यांच्या भावना जपणे हे आपलेच कर्तव्य नाही का? मग त्यांची दिवाळी आपल्यासारखीच व्हावी म्हणून प्रयत्नही आपणच करायला हवेत ना? आपल्या भरलेल्या फराळाच्या ताटातील अर्धी करंजी, लाडू, चकली, अनारसे आपण त्यांच्यासाठी दिले तर आपण नक्कीच उपाशी राहणार नाही. उलट भुकेल्या जीवाला दोन घास भरविल्याचा निखळ आनंद प्रत्यक्ष अनुभवता येईल. पाडव्यानिमित्त बाजारपेठेत झगमगाट होता. खरेदीसाठी ठिकठिकाणी झुंबड होती. एकीकडे प्रकाशपर्वाचा उत्साह ओसंडून वाहत असताना समाजातील काही उपेक्षित घटकांच्या मनामध्ये मात्र अंधार कोपरा कायम आहे. अशा कोपऱ्यातील अंधार दूर करून विश्‍वासाची दिवाळी निर्माण करण्याचे नियोजन आपण नाही तर कोणी करायचे? अनाथ मुले, भिकाऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुले अशा उपेक्षित घटकांसाठी नियमित काम करणाऱ्या अनेक संस्था शहरात आहेत. त्यांच्यातर्फे दिवाळीच्या दिवसांत राज्यात विविध उपक्रम राबविले जातीलही. त्यात साऱ्यांनीच खारीचा वाटा उचलणे ही खरी दिवाळी ठरणार आहे.गोव्यात गरीबी नाही, सगळीकडे आनंद मौजमजा आहे असे गोंडस पण फसवे चित्र रंगविले जाते. अन्य राज्यात गोवा म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्ग असाच समज आहे. हे खोटे आहे हे आपणास ठाऊक असल्याने समाजातील उपेक्षित घटकांना सणांच्या निमित्ताने आनंद देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. येथील काही टक्के लोकांचेच राहणीमान सुखवस्तू आहे. सरकारच्या दयानंद निराधार योजनेतील लाभार्थ्यांची यादी व आकडेवारी पाहिली तरी समाजाचे नेमके चित्र काय याचा प्रत्यय येऊ शकतो. ही मदत मिळविण्यासाठी कित्येकजण प्रतीक्षा यादीवर आहेत ही सांगूनही खरी न वाटणारी गोष्ट. तरीही समाजाचा एक दखलपात्र घटक निराधार आहे ही जाणीवच मन बधीर करणारी आहे. बाजारपेठेत पैसे मोडताना अशांचा चेहरा डोळ्यासमोर निश्‍चितपणे आणायला हवा. या दिवाळीच्या बजेटमधील काही वाटा त्यांच्यासाठी, याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. दान फक्त धनिकांनीच करावे हे मनातून यानिमित्ताने काढून टाका. प्रगतीकडे झेपावणाऱ्या या राज्यातील दुःख आणि दारिद्य्र मिटविण्यासाठी खारीचा का होईना वाटा उचलला पाहिजे.याच संदर्भात आणखी एक धक्‍कादायक बाब म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साडेचार टक्के लोक दारिद्य्र रेषेखालील जीवन जगतात. त्यांच्यासाठी सरकाराच्या अनेक सुविधा सोयी आणि सवलतीही आहेत. त्याने त्यांची आसवे पुसली जातील काहा खरा प्रश्‍न आहे.

Friday, April 15, 2011

बारबाला आल्या गोव्यात

मुंबईतील डान्स बारवरील बंदीच्या घोषणेचे एकीकडे लोकांमधून स्वागत होत असले, तरी त्या बारबालांनी आता गोव्याची वाट चालणे सुरू केले आहे. अगदी चाळिशी उलटलेले "तरुण'ही येथे मनसोक्त ऐष करताना पाहायला मिळाले. ओळखणारे फार कोणी नसल्याने हवा तसा धिंगाणा घालता येतो, हे खरे यातील "युनिक सेलिंग प्रेपोझिशन' आहे. चाळिशी उलटलेल्यांची पावलेही किनाऱ्यालगत अशी सेवा पुरविणाऱ्या ठिकाणांचे उंबरठे झिजवताना दिसताहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत डान्स बारचे हे पीक मुंबईबाहेरही फोफावायला सुरवात झाली. गोव्याचे किनारे तर जगप्रसिद्ध. मुक्त वातावरणामुळे या जागा तर या दृष्टीने मोक्‍याच्या आहेत. शहराजवळ असूनही, शहराबाहेर असल्याने ओळखणारे फार कोणी नसते आणि त्यामुळे निःसंकोच "ऐष' करता येते, हे खरे यातील "युनिक सेलिंग प्रेपोझिशन' आहे, असे येथे जाणारेच सांगतात. येथे येणारे लोक कोण आहेत, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या विधानाची सत्यता पटते. साध्या शीतपेयांचीच किंमत 120 रुपये असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तुमचा खिसा "गरम'च असावा लागतो. बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारी आतमध्ये कोणत्या दर्जाचे लोक असतील, याची कल्पना देतात.बक्कळ पगारावर नोकरी करणारे तरुण, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी अशी मोठी "रेंज' येथे पाहायला मिळाली. आश्‍चर्याची बाब म्हणजे युवकांपेक्षाही मध्यमवयीन (साधारण चाळिशीचे) लोकांचा येथे मोठ्या प्रमाणावर राबता आहे. खऱ्या अर्थाने "चार पावसाळे' पाहिलेल्यांचा हा नवा षौक असल्याचे येथे प्रत्यक्ष गेल्यावर लक्षात येते. "आयटेम गर्ल'चे चित्रपटातील नृत्य पडद्यावर पाहणे वेगळे आणि "याचि देही, याचि डोळा' प्रत्यक्ष तो अनुभव घेणे वेगळे,' असे समर्थन करीत तेथे जाणारे लोकही काही कमी नाहीत! पबमध्ये बारबालांचे नृत्य नसते. सर्वसाधारणपणे येथे केवळ "कपल'नाच प्रवेश असतो. तेथे येणाऱ्या ग्राहकांसाठीच "डान्स फ्लोअर' केलेला असतो. ज्या कोणाला नृत्य करायचे, तो तेथे नृत्य करू शकतो. पण ग्राहकासोबत बारबाला आल्या तर त्यांना अडविण्यासाठी कुठलीही कायदेशीर तरतूद नसल्याने त्याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे दिसून येते. नृत्याची नशा केवळ पैशाची उधळपट्टी करून थांबत नाही. त्यापुढील अनेक गोष्टी घडतात. काळ्या पैशाचे मोठे व्यवहारही येथे चालतात, असे जाणकार सांगतात. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच एका "कर्तव्यदक्ष' पहारेकऱ्याने सलाम ठोकून स्वागत केले. प्रत्यक्ष अशा ठिकाणी आत जाईपर्यंत तेथील "माहोल'ची काहीसुद्धा कल्पना येत नाही. आत गेल्यावर मात्र कर्कश संगीतानेच स्वागत होते. येथेही "रिमिक्‍स'चा प्रभाव जाणवतो! आतिथ्यशील वेटर तुम्हाला जागा सुचवतात. नेहमी येणारे "शौकीन' गिऱ्हाईक असेल, तर "डान्स फ्लोअर'च्या अगदी शेजारचे टेबल राखीव असते. प्रत्यक्ष "डान्स फ्लोअर'वर दिव्यांचा झगमगाट होता. संगीताच्या ठेक्‍यानुसार, प्रकाशयोजना बदलत असल्याचे दृश्‍य सध्या किनारी भागात पाहाता येते. अनेक मुली स्वखुशीने यामध्ये आल्याचीही माहिती मिळाली, तर काहीजणी गरजेपोटी करारावर (करार अर्थात तोंडीच असतो) येतात. ती मुलगी बारमालकाला अमुक एक रक्कम मिळवून देईपर्यंत संबंधित बारमध्ये काम करील, अशा प्रकारचा करार केला जातो. मात्र, थोड्या कष्टात मिळणारे बरेच पैसे हेच त्यांचे या व्यवसायाकडे वळण्याचे मुख्य आकर्षण आहे. येथील पैशाच्या उधळपट्टीची तर मोजदादच होऊ शकत नाही. ही धुंदी रात्र चढेल तशी उत्तरोत्तर रंगतच जाते आणि गिऱ्हाईकांचे खिसे रिकामे होतच राहतात.

Thursday, April 14, 2011

शिरोडा एकदा तरी भेट देण्याजोगे

वेंगुर्लेहून मोचेमाड ओलांडली की लागते आरवली. जयवंत दळवी यांचे गाव. तेथील परिसरावर आधारित अनेक कादंबऱ्या, कथा दळवींनी लिहिल्या, त्यांच्या नाटकाची बिजेही याच परिसरात अंकुरली असे सांगितले जाते. माझे मित्र अरुण नाईक यांच्यासोबत मी एकदा आरवलीला गेलो. तेथील भिके डोंगरी अरुणच्या श्रद्धेचा विषय. वि. स. खांडेकर शिरोड्यात असताना त्या डोंगरीवर जात म्हणून आम्हीही गेलो. शिरोड्यात रामपुरूष मंदिरासमोर विठ्ठल परब यांचे घर. रेडी येथे बंदर पूर्ण क्षमतेने सुरू असताना तेथील कॅन्टीन हे गृहस्थ चालवत. त्यांनी मला शिरोडा म्हणजे काय ते पायी फिरून दाखवले.नाबरवाडीत खांडेकर राहत ती वास्तू मला त्यांच्यामुळेच पाहता आली. रेडीला जाण्यापूर्वी मिठाचे आगर आहेत. त्या आगराच्या काठावर एक मोठा वृक्ष आहे. 1930 मध्ये दांडी येथे महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला त्याचवेळी शिरोड्यातही मिठाचा सत्याग्रह झाला होता. त्या वेळी लावलेल्या वृक्षाचे आज अजस्त्र वृक्षात रूपांतर झाले आहे. आज आगरात मीठ काढण्याऐवजी मत्स्यपालन करणे परवडत असल्याने मिठागरे काळाच्या उदरात गडप होण्याचाही धोका शिरोड्यासमोर आहे.शिरोडयात मी रमलो कारण तेथील खटखटे ग्रंथालय. सुटीच्या दिवसात 10-15 दिवस शिरोड्यात राहून या ग्रंथालयात असलेली विविध विषयांवरची पुस्तके वाचणे महाविद्यालयीन जीवनात आनंदाचे वाटे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयाखालोखाल या ग्रंथालयात ग्रंथसंपदा आहे असे मला वाटते. या ग्रंथालयाकडून मुख्य बाजाराकडे येताना समोरच माउलीचे मंदिर आहे.या मंदिरावरून न्यायालयीन लढा सुरू होता त्या वेळी जत्रोत्सव बंद होता तो काळही मी तेथे अनुभवला आहे. शिरोडा परिसरातील जत्रोत्सवाला दारूकामाची आतषबाजी एक खास आकर्षण असते. हे दारूकाम आरवली येथील मधुकर कुडव बंधू आणि आजगाव येथील राधाकृष्ण नार्वेकर यांनी बनविलेले असते. जत्रोत्सव म्हटला की भाविकांची अलोट गर्दी, पाहुण्यांची रेलचेल आणि दशावतारी नाटक (दहिकाला) अशी अनेकविध वैशिष्ट्ये असतात; परंतु शिरोडा परिसरातील जत्रोत्सवांचे वेगळे खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या भागात बनविलेल्या शोभेच्या दारूकामाची आतषबाजी. डोळ्याचे पारणे फेडणारी ही आतषबाजी असते. शिंगात भरलेल्या शोभेच्या दारूच्या जोरावर गोल फिरणारी "घिरट' न विझता फिरतच राहावी, असे वाटणारी आतषबाजी. आकाशात उंच उडल्यावर त्या ठिकाणी पुन्हा फुटणाऱ्या दारूकामातील वेगवेगळ्या प्रकारच्या चांदण्या या शिवकाशीमधील रेडिमेड नरसाळ्यारूपी दारूकामामुळे स्थानिक शोभेच्या दारूकाम वापराचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले आहे; मात्र शिरोडा येथील देवी माउली पंचायतन देवस्थान, आजगाव येथील देव रवळनाथ, रेडी येथील देवी माउली, आरवली येथील देव वेतोबा, देवी सातेरी, कंदवाडा देवी माउली आदी देवस्थानच्या जत्रोत्सवाला स्थानिक शोभेच्या दारूकामाची आतषबाजी पाहण्यास भाविकांची, रसिकांची बरीच गर्दी असते. ती अनुभवण्यासाठी डिसेंबरध्ये शिरोड्यात जायलाच हवे.