Wednesday, April 13, 2011

कोकणातील खेडे

कोकणात जाणे मला नेहमीच आवडत आले आहे. दाभोळचे अण्णा शिरगावकर, चिपळूणचे प्रकाश देशपांडे, सागरचे संपादक निशिकांत जोशी, सावंतवाडीचे अरविंद शिरसाट, वेंगुर्ल्यातील संजय मालवणकर, वैभववाडीचे प्रकाश काळे, गुहागरचे संकेत गोयथळे, रत्नागिरीचे गिरीश बोंद्रे, मंडणगडचे विकास शेटये यांच्यामुळे कोकण बरेच समजून घेता आले.त्यांच्याकडून मी संकलीत केलेल्या माहितीनुसार कोकणातील प्राचीन खेडी स्वयंपूर्ण होती. मात्र बदलत्या काळानुसार खेड्यातील चांगल्या चालीरीती, परंपरा नष्ट झाल्या आणि खेडी भकास झाली आहेत. चौसोपी कौलारू घर, ओटी, पडवी, माजघर, न्हाणीघर, अंधारात असणारे स्वयंपाकघर, घरापाठीमागे गुरांचा गोठा, नारळी-पोफळीच्या बागा, शेतमळा, पाटाचे पाणी, कौलारू घरातून बाहेर पडणारा धूर, गावातून वाहणारी नदी, प्राचीन इतिहासाची साक्ष देणारी मंदिरे खेड्यात आजही पाहता येतात. स्वयंपूर्ण खेड्यातील लोकजीवन, संस्कृती, बारा बलुतेदारांचे व्यवसाय, एकोपा, चालीरीती, पद्धती तेथे राहून अभ्यासण्यासारख्या आहेत. कोकणातील गावे डोंगराळ भागात वसलेली असतात. दोन गावे किंवा एकाच गावातील दोन वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जायचे झाले, तरी एखादा छोटासा डोंगर पार करावा लागतो. तो कष्टप्रद अनुभव दत्तप्रसन्न कुलकर्णीसोबत मी अनेकदा घेतला आहे. दरीतून जाणाऱ्या पक्‍क्‍या पाऊलवाटांनी जाण्याचा अनुभव घेण्यासाठी चिपळूणजवळील पोफळी परिसरात जायला हवे. लाल चिऱ्याच्या दगडापासून बांधलेल्या या वाटांना बांधघाटी किंवा पाखाडी म्हणतात. रत्नागिरी शहर आणि परिसरात अशा अनेक पाखाड्या आजही सुस्थितीत आहेत. गूळपाणी देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करून घेण्याची मजा फक्त कोकणातच अनुभवता येते.कोकणात फिरताना कुठे तरी डोंगरात भेटते परशुरामाची मूर्ती. कोकणाला परशुरामभूमी म्हणून संबोधले जाते. परशुरामाकडून झालेले निःक्षत्रीयीकरण, समुद्र हटवून कोकणाची निर्मिती आदी कथा चिपळूणच्या निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांच्याकडूनच ऐकायला हव्यात. परशुराम शास्त्रज्ञ कसा होता हे नानांच्या तोंडून ऐकताना समाधीच लागली पाहिजे. कोकणात फिरताना ग्रामदैवत वाघजाईचे मंदिर सापडायचे. हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव असताना कोकणातल्या देवीचे नाव वाघजाईच का, असा प्रश्‍न मला एकदा पडला. वाघ असलेले जंगल पर्यावरणदृष्ट्या समृद्ध समजले जाते. त्याची उपास्य देवता म्हणून वाघजाईची पूजा केली जाते. संपूर्ण गाव याच एका ठिकाणी एकत्र होत असे. येथील निवाडे अंतिम असत, अशी माहिती अनेकांशी या विषयावर चर्चा केल्यावर मिळाली.पूर्वी गावाच्या प्रारंभीच नाभिकाचे दुकान असे. गावाचा प्रमुख असलेला खोत, विविध शस्त्रांसह शेतीची अवजारे तयार करून देणारा लोहार, अल्प वस्त्रात असला तरी गावाचे पोषण करणारा- शेती करणारा कुणबी, कासार, कुंभार, सुतार, चर्मकार, धनगर, कोळी असे बलुतेदार भेटण्यासाठी कोकण दौऱ्याला पर्याय नाही.

Tuesday, April 12, 2011

वेंगुर्ले मी पाहिलेले

गेल्या आठवडयात नातेवाईकांकडे जाण्याच्या निमित्ताने कोकणातील वेंगुर्लेत गेलो होतो. वेंगुर्ले सागर किनाऱ्यावर वसलेले एक देखणे गाव. वेंगुर्ल्यात संजय मालवणकर यांच्याबरोबर अनेकदा मी फिरलो. एक दोनदा शिरोड्याच्या अनिल निखार्गे यांच्याकडूनही वेंगुर्लेबाबत माहिती घेतली.वेंगुर्लेच्या मार्केटबाबत मला त्या वेळी नेहमीच कुतूहल वाटत असे. हे मार्केट कुठे तरी पाहिल्याचे राहून राहून वाटत असे. गुरुनाथ कदम यांच्याबरोबर एकदा भल्या पहाटे वेंगुर्ल्याला जाताना वाटेत सहज गप्पा मारताना त्यांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट बांधण्यापूर्वी क्रॉफर्ड वेंगुर्ल्यात होते त्यांनीच वेंगुर्ल्यातील मार्केट बांधल्याची माहिती दिली. म्हणजेच मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे वेंगुर्ल्यातील मार्केटची मोठी प्रतिकृती होय. त्या मार्केटची नंतर तपशीलवार पाहणी मी केली. छायाचित्रेही टिपली. 60-70 च्या दशकात वाहतुकीचा प्रमुख मार्ग समुद्र होता. त्यामुळे जहाजे, गलबते ही मालवाहतुकीची साधने होती. त्यामुळे अगदी कोल्हापूर-बेळगावपर्यंतचाही माल वेंगुर्ले बंदरातून जात होता. त्यामुळे दुकानांच्या संख्येएवढीच किंबहुना जास्त संख्येने येथे मालाचा "क्‍लिअरन्स' करणाऱ्या पेढ्या होत्या. आज शहरातील स्टेट बॅंक, सिंडिकेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया अशा बॅंका पूर्वीच्या व्यापारी पेढ्यांच्या इमारतीत स्थानापन्न झाल्या आहेत. यावरूनच या पेढ्यांच्या व्यवसायाचा आवाका लक्षात येईल.विदेशींनी व्यापारासाठी बांधलेली वखारही वेंगुर्लेत भग्नावस्थेत आहे. तत्कालीन लष्करी तळ असलेला परिसरही आज कॅम्प या नावानेच ओळखला जातो. वेंगुर्लेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे. तेथे विकसित करण्यात आलेले वेंगुर्ले जातीची काजूची कलमे आता सर्वमान्य झाली आहेत. तेथेही अनेकदा मी गेलो.  समुद्राच्या कुशीत विसावलेल्या वेंगुर्ले येथे सेंट लुक्‍स हॉस्पिटल गेली शंभरेक वर्षे आरोग्यदानाच्या सेवेचे कार्य करीत आहे. सेंट लुक्‍स हॉस्पिटल मिशनरी लोकांनी सुरू केले. आजपर्यंत लाखो रुग्णांना जीवदान देणारे हे हॉस्पिटल आहे. सिंधुदुर्गातील सर्वांत जुन्या हॉस्पिटलमध्ये याचा समावेश होतो. बॅ. खर्डेकर विद्यालय, वेंगुर्ले हायस्कूल, सेंट लुक्‍स हॉस्पिटल आदी संस्था वेंगुर्ले तालुक्‍याबाहेरील लोकांनी येथे सुरू केल्या. त्या व्यक्ती आज जिवंत नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र आजही जिवंत आहेत. 1915 मध्ये स्थापन झालेल्या या हॉस्पिटलमध्ये त्या काळी गोव्यातूनही रुग्ण येत अशी माहिती मला तेथे मिळाली. आज मात्र उलटी स्थिती आहे. आज लोक मासे आणण्यासाठी वेंगुर्लेत जातात आणि तेथील रुग्ण बांबोळीला येतात.

Sunday, April 10, 2011

मुंबापुरीच्या सागरी पर्यावरणालाही घरघर

सागराच्या पोटात साठणाऱ्या शेवाळामुळे जन्माला येणाऱ्या बॅक्‍टेरियांमुळे समुद्राच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने हे अत्यंत धोकेदायक असून, कोट्यवधींची लोकसंख्या सहन करीत कशीबशी उभी असणारी महानगरी मुंबई आता या धोक्‍याच्या कड्यावर पोहोचली आहे... पणजीजवळच्या दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांनी मुंबईतील बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे गेल्या 40 वर्षांत सागरी पर्यावरणावर पडलेल्या ताणाचे विश्‍लेषण करून काढलेल्या अहवालात वरील निष्कर्ष नोंदविणयात आला आहे."एनआयओ'चे एस. एस. सावंत, लीना प्रभुदेसाई, के. व्यंकट हे शास्त्रज्ञ जहाजातून सोडण्यात येणाऱ्या बलास्ट वॉटरचा अभ्यास करताना (जहाज समतोल राहावे म्हणून जहाजाच्या वेगवेगळ्या कप्प्यांत गरजेनुसार पाणी भरण्यात येते. गरजेनुसार पाणी जहाजाबाहेर फेकलेही जाते. या पाण्यातून त्या त्या ठिकाणचे जीवजंतू नव्या ठिकाणी येतात. या पाण्याला बलास्ट वॉटर म्हणतात) मुंबई बंदर आणि परिसरातील पाण्यात बॅक्‍टेरियांचा वाढलेला वावर या संशोधकांना अस्वस्थ करून गेला. समुद्रातील पाण्याच्या अभ्यासासाठी निर्माण केलेल्या वीस केंद्रांवर नियमितपणे या पाण्याचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करणे सुरू होते. मुख्य कामाबरोबर समांतर असे हे काम सुरू होते. वर्ष दोन वर्षाने लक्षात आले, की या मुंबईलगतच्या पाण्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण फार आहे. असे असले तर सागराच्या पोटातील पूर्ण विकसित अशी जीवसृष्टी तेथे असायला हवी होती. पण तसे काही चित्र दिसत नव्हते. परिसरातील कंपन्या, हॉटेलांचे सांडपाणी आणि शहरातील गटारे यांतून अन्नद्रव्ये समुद्राच्या पाण्यात मिसळत असतात. मुंबईलगतच्या समुद्रात शास्त्रज्ञांना हेच नेमके आढळले. तेथे बॅक्‍टेरियांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. बॅक्‍टेरियांना पाण्यात मिसळलेला प्राणवायू मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने तेथे अन्य जीवजंतू जगू शकत नाहीत. त्यामुळे अन्नद्रव्याने श्रीमंत अशा मुंबईलगतच्या समुद्रातल्या जीवसृष्टीला ओहोटी लागल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी तसा शोधनिबंधही सादर केला आहे.ंबईची लोकसंख्या 1060 मध्ये चार दशलक्ष होती, तर 2001 मध्ये ती 18.3 दशलक्षवर पोचली व 2011 मध्ये ती 22.4 दशलक्षवर पोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यातील संबंधित अन्नद्रव्यांच्या घटकांच्या उपस्थितीची 1960 पासूनची उपलब्ध माहिती या शास्त्रज्ञांनी अभ्यासणे सुरू केले. त्यातून हा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला. त्यांनी 2001-02 मध्ये प्रत्यक्षपणे अनेक नमुनेही गोळा केले त्यांचे विश्‍लेषणही त्यांच्या निष्कर्षाचीच पुष्टी करते. "नायट्रेट'चे वाढते प्रमाण सागरी पर्यावरणाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार असा प्रश्‍न शास्त्रज्ञांना आता पडला आहे.

एडनच्या आखातातील पाण्याचे अंतरंग उलगडले

एडनच्या आखातातील वरून एकच दिसणाऱ्या; पण प्रत्यक्षात तसे नसलेल्या पाण्याचे अंतरंग उलगडण्यात एका संशोधकाला यश आले आहे. विशेष म्हणजे, हा संशोधक गोवा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. येमेनच्या साना विद्यापीठातील महम्मद अली अल साफानी यांनी गोवा विद्यापीठात "पीएचडी'साठी संशोधन सुरू केले आहे. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत (एनआयओ) डॉ. सतीश शेणॉय यांच्यासोबत संशोधन करताना साफानींनी हा शोध लावला आहे. त्यांनी या पाण्याबाबत 1920 पासून आजवर उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचे विश्‍लेषण केले. त्यातून, क्षारतेनुसार एडनच्या आखातात चार प्रकारचे पाणी अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले आहे. या आखातात तांबड्या समुद्रातून येणाऱ्या पाण्याचे प्राबल्य असून, ते एकूण पाण्याच्या 37 टक्के असल्याचे साफानी यांनी आपल्या संशोधनपर निबंधात म्हटले आहे. आखाताच्या पृष्ठभागावरील पाणी हे तीन टक्‍क्‍यांहून कमी आहे आणि पश्‍चिमेकडील अरबी समुद्र व स्थानिक पातळीवर जमा झालेले पाणी, यातून ते बनलेले आहे. उन्हाळ्यात तांबड्या समुद्रातून आलेले पाणीही यात मिसळते. या पाण्याचे प्रमाण नऊ टक्के आहे, तर त्याची क्षारता सर्वांत कमी म्हणजे प्रत्येक घनमीटरला 26.50 किलो असल्याचेही आढळले आहे. आखाताच्या तळाचे पाणी तांबडा समुद्र आणि दक्षिणेकडून येणाऱ्या पाण्याने बनले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आखातातील पाणी एकच दिसत असले, तरी शास्त्रीय तपासणी केल्यावर त्याचे चार प्रकार स्पष्ट झाले आहेत.साफानी 2003 मध्ये "एनआयओ'मध्ये रुजू झाले. त्यापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातून सागरी विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. याविषयी डॉ. शेणॉय यांनी सांगितले, की यासाठी किमान वीस ठिकाणच्या पाण्याचे नमुने गोळा करावे लागले आणि ते सर्व वेगवेगळ्या ऋतूतील होते. एडनच्या आखातातील पाणी एकसारखे नाही, असा शास्त्रज्ञांचा या पूर्वीही समज होता; पण नेमकी पाण्याची विभागणी कशी आहे, यापर्यंत कोणाला पोचता आले नव्हते. क्षारता हा मुद्दा महत्त्वाचा मानून आम्ही पाण्याच्या पृथःकरणासाठी काही प्रमेये स्थापित केली. त्यानुसार विश्‍लेषण केल्यावर हाती आलेली माहिती थक्क करणारी असून, तिच्या आधारे जैवचक्रात होणारे बदल, घटते मत्स्योत्पादन आदींविषयी पुढील संशोधन शक्‍य होणार आहे.

Tuesday, April 5, 2011

खाणींच्या दुष्परिणामांचा अभ्यास आता कसला?

खाणींमुळे होणाऱ्या पर्यावरण हानीच्या अभ्यासार्थ प्रा. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय योग्य असला तरी त्याला फार उशीर झाला आहे. खाणपट्ट्यातील जनजीवनावर खाणकामाचा किती परिणाम झाला आहे याचा व्यापक शोध घेऊन सरकारने खरेतर याविषयी श्‍वेतपत्रिकाच काढण्याची गरज आहे. खाणकामामुळे पाण्याचे स्त्रोत आटण्यासह आरोग्याची झालेली धूळदाण पाहण्यासाठी समिती कशाला हवी? खनिज उद्योगाने आर्थिकदृष्ट्या उभारी दिली असली तरी पर्यावरणाची झालेली अपरिमित हानी कधीही भरून न येणारी आहे.
खाणकाम म्हणजे खुदाई हे ठरून गेलेलेच आहे. मध्यंतरी चीन, जपानसह सर्वत्र खनिजांची मागणी वाढल्याचे पाहून खाणकामाचे वाढलेले प्रमाण केवळ चिंता करण्यास लावणारेच नव्हे तर गोव्याच्या निसर्गावर घाला घालणारे ठरले आहे. गाडगीळ यांची समिती दोन वर्षांनी अहवाल देणार आहे. येत्या वर्षभरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. नव्याने सत्तेवर येणाऱ्या सरकारपुढे हा अहवाल येईल. सत्तेवर कुणी असला तरी त्याच्यावर मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक असते हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्षात केवळ सरकारच नव्हे तर खात्याचा मंत्री बदलला तरी होणारे दृश्‍य बदल इतके असतात की नवे सरकार या अहवालाकडे कसे पाहिल आणि त्यातील शिफारशींची अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे करेल याची कल्पना आता करता येणार नाही.
खाणपट्ट्यात ट्रकांची वाहतूक हा एक स्वतंत्र विषय. मध्यंतरी ट्रकाच्या धडकेत मृत्यू पावलेल्याच्या कुटूंबियांस अमूक लाख रुपये देण्याची आणि त्यानंतर असे प्रकार घडल्यास अशीच भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यातून खाण व्यवसायात गुंतलेल्यांचे निर्ढावलेपण ठळकपणे समोर आले होते. विधानसभेतही खाणपट्ट्यातील रहदारीचा विषय अनेकदा चर्चेला आला. खाणपट्ट्यातील ट्रकांची भीती वाटल्याने आपण सरकारकडून उंच गाडी घेतल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही म्हटले आहे. सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी वाहतूक कोंडीमुळे आपण अडकून पडल्यानंतर पोलिसांना कसे बोलवावे लागले याचाही किस्सा सांगितला आहे.
सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही. त्याला प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यावाचून गत्यंतर नसते. खाण क्षेत्रातील विद्यार्थी जीव मुठीत धरून कसे शाळेत जातात याची कल्पना शहरात बसून येणार नाही. या बालमनावर आपण काय बिंबवतो आहोत याचे भान कुणालाही नाही. सतत धूळ फुफुस्सात गेल्याने आरोग्यावर होणारे परिणाम आयुष्यभर सोबत करणारे असतात. अशा पिढ्याच्या पिढ्या उध्वस्त होणे आणि दुसऱ्या बाजूने खाणकामातून मिळणारी रॉयल्टी वाढली आणि त्यातून आम्ही जनतेसाठी चार योजना राबविणार असे सरकार कोणत्या तोंडातून सांगू शकते? सारेजण असंवेदनशील होत चालल्याचेच हे लक्षण आहे.
खाणीमुळे काहींचे भलेही झाले असेल पण अशा व्यक्ती अगदी कमी संख्येने आहेत. खाणींचा चटका बसणारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. कावरे येथे हा समाज एकत्र झाला, खाण संचालकांना रात्री उशिरापर्यंत थांबण्यास भाग पाडून त्यांनी खाण बंदचा आदेशही मिळविला. रस्त्यावर आल्याने प्रश्‍न सुटतो असे उदाहरण या घटनेने घालून दिले आहे. आजवर खाणकामाच्या विरोधात समाज एकत्र आल्याचे तसे ठळक उदाहरण नव्हते. आता कावरेवासींयाप्रमाणे इतरत्र लोकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला तर खाणकाम चालूच शकणार नाही. खाणी सुरू करण्यापूर्वी होणाऱ्या जनसुनावणीत लोक उपस्थित राहून विरोध करू लागले आहेत. खाणींमुळे समाजाचे भले होत नसल्याने गोवा मुक्‍तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तरी लोकांच्या लक्षात येऊ लागले हेही नसे थोडके.
एकेकाळी खाणकाम प्रतिष्ठेचे मानले जात होते. मात्र तसे चित्र आज राहिलेले नाही. मध्यंतरी बेकायदा खाणकामाने उरली सुरली प्रतिष्ठा धुळीस मिळविल्याने खाणकामाने कमावलेले नाव गमावण्याची वेळ आली आहे.
या साऱ्यामुळे झालेल्या ऱ्हासाचा अभ्यास माधव गाडगीळ यांची समिती करणार आहे पण दोन वर्षे खाणकाम सुरू तर राहिले पाहिजे. सध्याचा खुदाईचा वेग पाहिल्यास कदाचित ही समिती अहवाल सादर करून त्यावर विचार होईपर्यंत खाणकाम करण्यासाठी खनिजच शिल्लक राहणार नाही अशी आजची स्थिती आहे. त्याचमुळे आता समिती नेमण्याचे प्रयोजनच संशयात आले आहे.

Monday, April 4, 2011

सेतुसमुद्रमचा अभ्यास "एनआयओ'कडे

केंद्रीय जहाज उद्योग मंत्रालयाने गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडे (एनआयओ) सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या अभ्यासाचे काम सोपविले आहे. सेतुसमुद्रमच्या नव्या मार्गाच्या आखणीचे काम सध्या सुरू आहे. त्याचा समुद्रीय पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास ही संस्था करणार आहे.भारताचे दक्षिणेकडील टोक आणि श्रीलंकेचे उत्तर टोक या कालव्याद्वारे जोडण्यात येणार आहे. या कालव्याच्या मार्गाबाबत सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. या समितीनेच "एनआयओ'च्या नावाची शिफारस केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. आर. के. पचौरी आहेत. "एनआयओ' या अभ्यासात आणखी दोन संस्थांचीही मदत घेत आहे. त्यासाठी नऊ कोटी 45 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी (निरी) व बेंगळुरु येथील भारतीय व्यवस्थापनशास्त्र संस्था याकामी "एनआयओ'ला मदत करणार आहे. कोची येथे असलेल्या "एनआयओ'च्या केंद्रामार्फत हे काम मार्गी लावले जाणार आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. सनीलकुमार हे काम पाहणार आहेत.न्नारच्या आखातातील, पाल्कच्या समुद्रधुनीतील पर्यावरणीय माहितीचे संकलन व विश्‍लेषण याअंतर्गत केले जाणार आहे. सेतुसमुद्रम प्रकल्पाची उपयुक्तता यावरही अभ्यासात भर देण्यात येणार आहे.

Friday, April 1, 2011

बुडालेले मंदिर सापडले

समुद्राचे जमिनीवर आक्रमण होत असल्याचे पुरावे यापूर्वीच शोधण्यात आले आहेत. पण, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांना आता जमिनीचेही समुद्रावर आक्रमण होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर समुद्र मागे हटल्याचे पुरावे हाती आले असून, पिंदारा येथे बुडालेले मंदिर संकुलच सापडले आहे. "एनआयओ'च्या सागरी पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. के. एच. व्होरा यांनी "गोमन्तक'ला ही माहिती दिली. समुद्रात शेकडो तास डायविंगचा अनुभव असलेले ए. एस. गौर व सुंदरेश यांनी पिंदारात सापडलेल्या मंदिर संकुलाचा अभ्यास सुरू केला. हे संकुल पूर्वी समुद्राच्या पोटात गाडले गेले होते, अशी धक्कादायक माहिती प्रयोगशाळांतील चाचण्यांतून पुढे आली. सौराष्ट्र किनाऱ्यावर कच्छच्या आखातापासून 36 किलोमीटरवर पिंदारा आहे. हा भाग म्हणजे दलदल आहे. ती "ओखा रण' नावाने ओळखली जाते. समुद्राचे पाणी ओसरत जाऊन ती जमीन तयार झाल्याची माहिती स्थानिकांनी गौर यांना दिली. त्यानंतर तेथे उत्खननाचा निर्णय घेतला. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर तेथे आता मंदिराचे संकुल च आढळले आहे. पाच मीटर खोल अशी दलदल त्यासाठी हटवावी लागली आहे. त्याखाली असलेल्या पाण्यात हे संकुल आहे. त्या भागात एक ते चार मीटरच्या लाटा येत होत्या, असेही आढळून आले आहे. त्यामुळे कोणे एके काळी हा भाग समुद्राच्या पोटात गडप झाला होता याचा अंदाज घेत बांधकामांवर विविध चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून ही मंदिरे बराच काळ पाण्याखाली होती, असे सिद्ध झाले आहे. सातव्या ते दहाव्या शतकात पिंदाराचे बांधकाम झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.पिंदारा तरकक्षेत्र म्हणून आठव्या शतकात हा भाग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होता, असा पुरावाही शास्त्रज्ञांच्या हाती आला आहे. देवपुरी नावाचे शहर द्वारका अस्तित्वात येण्यापूर्वीच अस्तित्वात होते असे सांगितले जाते. ऋषी दुर्वास, अगस्ती यांचे मठ तेथे होते असेही सांगितले जाते. पिंदारा सापडल्याने त्याच्यातून देवपुरीच्या शोधासाठी काही पुरावे मिळतात याचा शोध शास्त्रज्ञांनी सुरू केला आहे. समुद्राच्या पातळी होणारे बदल, किनाऱ्याची धूप, पाण्याच्या तापमानातील चढ-उतार या घटकांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी सुरू ठेवला आहे. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी समुद्राच्या तळाशी केले जाणारे उत्खनन तर महत्त्वपूर्ण ठरते आहे. आपल्या पूर्व किनाऱ्यावर पंपहार बुडाल्याचा उल्लेख तमीळ वाङ्‌मयात आहे. द्वारकेचाही असाच उल्लेख आढळतो. किनारी भागातील बदलांमुळे असे होत असावे, असा ढोबळ निष्कर्ष काढून पुरातत्त्व तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला असता पंपहार व द्वारका शोधण्यात त्यांना यश आले. महाबलीपूरम हा कित्येक मंदिरांचा समूहच समुद्राच्या उदरात गडप झालेल्या स्थितीत शास्त्रज्ञांना सापडल्याने आजवर समुद्रच भूमीवर आक्रमण करतो असा समज सार्वत्रिकरीत्या रूढ झाला होता. आता तो समज मागे पडून जमिनीचेही समुद्रावर मर्यादित स्वरूपात का होईना आक्रमण होते व समुद्रही मागे हटतो असे म्हणता येण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.